सांगलीत धक्का...सावली बेघर निवारा केंद्रात 37 जण पॉझिटिव्ह; कुदळे प्लॉटमध्ये तीन, मिरजेत दोन, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बाधित; एकुण 43 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 July 2020

जिल्ह्यात एकुण 747 रुग्णसंख्या झाली असून महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या 167 झाली आहे. 

सांगली ः येथील सावली बेघर निवारा केंद्रातील 37 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यासह शहरातील कुदळे प्लॉट येथे तीन रुग्ण, तर मिरजेतील मंगळवार पेठ आणि कमानवेस येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. तसेच एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. बारा तासात शहरात 43 नवे रुग्ण झाल्या महापालिका क्षेत्र हादरले आहे. जिल्ह्यात एकुण 747 रुग्णसंख्या झाली असून महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या 167 झाली आहे. 

गेल्या आठवड्यापासून महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी सावली निवारा केंद्रातील एकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर केंद्र सील करण्यात आली. तेथील 57 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आली. त्यातील 37 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. महापालिकेच्यावतीने हे केंद्र चालविले जाते. शहरात फिरणाऱ्या बेघरांना याठिकाणी निवारा दिला जातो. एकाच ठिकाणी 37 जणांना लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. तेथील पॉझिटिव्ह लोकांना तातडीने कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सारा परिसरात औषध फवारणी करण्यात आली असून कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे व त्यांचे पथकाने परिसरास भेट दिली. 

यासह शहरातील कुदळे प्लॉट येथे एकाच कुटुंबातील तिघांना लागण झाली. तसेच मिरजेतील कमानवेस आणि मंगळवार पेठ याठिकाणीही रुग्ण मिळून आले. यासह एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाली आहे. दिवागणीक रुग्णसंख्येत वाढ होत असून खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

 

  • आजअखेरचे एकूण रुग्ण- 747 
  • उपचार घेत असलेलेरुग्ण- 349 
  • आजअखेर बरे झालेले रुग्ण- 375 
  • आजअखेर मृत झालेले रुग्ण- 23 
  • महापालिका क्षेत्र बाधित- 167 

संपादन ः शैलेश पेटकर 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli shock ... 37 positive in Savali shelter; Three in Kudale plot, two in Miraj, disrupted medical college students; A total of 43 patients