
सांगली : नव्या पीक पॅटर्नचे बीजारोपण
सांगली: जिल्ह्यात सूर्यफुलाची पावणेदोन हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी ही सुखावह बातमी आहे. जिल्ह्याच्या पीक पॅटर्नवर आणि ऊस, द्राक्षाला सक्षम पर्याय देण्यावर अनेक वर्षे चर्चा होत आली आहेत. शेतकऱ्यांनी आता स्वतः पुढाकार घेत नवा प्रयोग हाती घेतला आहे. तेलबियांचे उत्पादन वाढवणे, ड्रॅगन फ्रूटसारख्या फळांना व भारतभर मागणी असलेल्या भाजीपाला पिकांना प्राधान्य देण्यासाठी हा बदल महत्त्वाचा आहे.
राज्य शासन, जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर नवा ‘पीक पॅटर्न’ कधी राबवला जातोय, याची शाश्वती नाही. शेतकरी स्वतः काही बदल करू पाहात आहेत, त्याला स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक बाजार उपलब्ध करून देण्यात राज्य व केंद्र शासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या पाणी योजनांतून सिंचन क्षेत्र वाढत असताना फक्त ऊस आणि द्राक्षलागवड झपाट्याने वाढत गेली.
त्याचा गंभीर परिणाम बाजार स्थितीवर झाला. नवा पीक पॅटर्न आला पाहिजे, बाजाराची मागणी पाहून पीक घेतले पाहिजे, यावर चर्चा होत राहिली. धोरण ठरले नाही. माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्याबाबत लवकर बैठक घेऊन धोरण ठरवू, असे जाहीर केले. तोवर राज्यातील सत्ताबदल झाला. आता नवीन पालकमंत्री येतील, त्यांनी पुढाकार घेऊन आणि जयंत पाटलांनी लक्ष घालण्याची गरज आहे. शेतकरीही सकारात्मक असून, कृषी विभागाने बळ देणे गरजेचे आहे.
ऊस, द्राक्षाला सक्षम पर्यायी पिकांबाबत गंभीर होण्याची वेळ
तेलबिया, ड्रॅगन फ्रूट पिकवण्यास प्राधान्य दिल्यास आर्थिक विकास
बाजाराची मागणी पाहून पिक निवडण्याची गरज
बदलास शेतकरीही तयार,
कृषी विभागाने पाठबळ द्यावे
ऊस पीक
१) जिल्ह्यातील पाच साखर कारखाने बंद आहेत. परिणामी, ऊस गाळपासाठी नेण्याचे आव्हान मोठे आहे. कारखान्यांवर ताण येतोय. शिल्लक उसाची समस्या गंभीर होत आहे.
२) मराठवाड्यासह जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. जिल्ह्यात क्षेत्र छोट्या तुकड्यांमध्ये विभागले असल्याने यांत्रिक तोडीला मर्यादा आहेत.३) म्हैसाळ, टेंभू, ताकारी येथून शेकडो किलोमीटर पाणी नेऊन त्यावर ऊस पिकवणे आर्थिकदृष्ट्या योग्य नाहीच, शिवाय हा पॅटर्न धोरणात्मकदृष्ट्याही घातक आहे.
द्राक्ष पीक
१) लहरी हवामानाचा प्रचंड दणका सातत्याने बसत आहे. मार्केटिंगच्या द्राक्षांना देश-विदेशाची बाजारपेठे खुणावत असली तरी एका पावसाने चित्र होत्याचे नव्हते होत आहे.
२) बेदाण्याचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. तुलनेत बाजारातील उठाव कमी होतो आहे. भारतात आर्थिक मंदीचा फटका चैनीच्या वस्तू खरेदीवर होताना दिसतोय. त्याचा परिणाम बेदाण्यावर झाला आहे.
सूर्यफूल लागवडीने आशेचे किरण...
जिल्ह्यात यंदाच्या खरिपातील पेरणीचे आकडे समोर आले असून, त्यात एक आशेचे नवा किरण दिसला आहे. सूर्यफुलाची तब्बल १ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. एकूण तेलबिया क्षेत्र ६७ हजार एकरांवर पोहोचले आहे. हा सुखद धक्का आहे. भारत हे तेल आयात करणारा प्रमुख देश आहे. देशातच तेलबीयांचे पीक वाढले पाहिजे, यावर अनेक वर्षे चर्चा होत आली आहे. आता त्याला काहीअंशी मूर्त स्वरूप येताना दिसत आहे. खाद्यतेलाच्या किमतीत गेल्या काही दिवसांत थोडी कमी आली असली तरी गेल्या दोन वर्षांतील वाढ प्रचंड आहे. त्यामुळे तेलबीयांच्या पिकांना नक्कीच बाजारात चांगला मोबदला मिळणार आहे.
डाळींब, ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढावे...
डाळिंब आणि ड्रॅगन फ्रूट हा एक उत्तम पर्याय ठरताना दिसत आहे. जागतिक बाजारात मोठी मागणी असलेली ही पिके आहेत. दोन्ही दुष्काळी भागात आणि कमी पाण्यात पिकत आहेत. ड्रॅगन फ्रूटचा बाजारभाव नियंत्रित ठेवता आला आणि स्वतः उत्पादक बाजारात उतरले तर सामान्य माणसाला या फळाची गोडी लागू शकते. सध्या व्यापाऱ्यांच्या अनियंत्रित दराने हे फळ श्रीमंतांचे म्हणूनच ओळखले जात आहे. ते केळीप्रमाणे सहज व स्वस्त उपलब्ध झाले तर नक्कीच या पिकाचे क्षेत्र वाढले तरी स्थानिक बाजारात उठाव शक्य आहे.