सांगली : खोडमाशीने सोयाबीन फस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन

खोडमाशीने सोयाबीन फस्त

सांगली : अवेळी लागवडीने खोडमाशीचा जिल्ह्यात मोठा प्रादुर्भाव झाला असून, त्याचा मोठा फटका जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्राला बसला आहे. आजघडीला बहुतांश पीक वाया गेले असून, जिल्ह्यात ४० हजार ३०० हेक्टरवरील सोयाबीन क्षेत्र पूर्णतः धोक्यात आले आहे. नुकसानीचे पंचनामे करून शासनाने किमान मदतीची भूमिका घ्यायला हवी.

गेली काही वर्षे सोयाबीनचे क्षेत्र वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत येत आहे. ‘कृष्णा’काठी गेली दोन वर्षे महापुराचा फटका बसला होता. यावर्षी महापुराचा नाही, मात्र आगाप लागण केलेले बहुतांश सोयाबीन क्षेत्र वाया गेले आहे. शेतीची पूर्वमशागत पूर्ण झाल्यापासून साधाराण ७० दिवसांचे पीक झाले आहे. यावर्षी मे महिन्यात झालेल्या पावसाच्या ओलीवर बहुतेक ठिकाणी पेरणी व टोकणी झाली आहे. चांगल्या दराची अपेक्षा आणि पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात मळणी पावसामुळे अडचणीत येत असल्याने सोयाबीनची आगाऊ लागवड होत आहे. त्याचा फटका यावर्षी बसला आहे.

गेली महिनाभर खोडमाशीच्या प्रादुर्भावाचा धुमाकूळ सुरू आहे. पीक वरून हिरवे दिसत असले तरी खोड आतून पोखरले जाते. बघता-बघता हिरवे पीक आठ दिवसांत पिवळे पडल्याचे दिसत आहे. कृषी विभागाने आवश्‍यक औषधे आणि टॉनिकबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही.

पाच वेळा टॉनिक व औषधांची फवारणी केली आहे, तरीही सोयाबीन वाया गेले आहे. प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत १७९६ रुपये भरून ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरले आहेत. ‘पावसाने सोयाबीन गेले, तरच विम्याची रक्कम मिळू शकेल; रोगासाठी भरपाई नाही,’ असे नवेच ऐकायला मिळत आहे. कृषी विभागाने ज्यांनी विमा घेतला, त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.

- डॉ. मनोज पाटील, शिरगाव

सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर मराठवाड्यातही सोयाबीन अडचणीत आहे. यावर्षी खोडमाशीचा भयंकर प्रादुर्भाव आहे. दरवर्षी हा त्रास असतो, मात्र यावर्षी बहुतेक ठिकाणी आगाप लागवड झाल्याने खोडमाशीला जगण्यासाठी भरपूर वाव मिळाला. पुढील वर्षी तरी शेतकऱ्यांनी १५ जूननंतरच लागवडी कराव्यात. बीजप्रक्रिया, तसेच खते आणि वेळेत फवारण्यांकडे लक्ष द्यावे.

- सचिन महाजन, सहायक प्राध्यापक,वनस्पती रोगशास्‍त्र संशोधन विभाग, कृषी संशोधन केंद्र, कसबेडिग्रज

Web Title: Sangli Soybean Crop Destroyed By Weevils

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..