सांगली : इमारतीत भटकी जनावरे, मद्यपींचा अड्डा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 मिरज वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता धोक्यात आली.

सांगली : इमारतीत भटकी जनावरे, मद्यपींचा अड्डा

सांगली : शहरात जिल्हास्तरावरचे प्रमुख प्रशस्त जिल्हा क्रीडा संकुल असतानाही केवळ राजकीय हट्टापोटी स्वतंत्र तालुका क्रीडा संकुल उभारण्याचा घाट घातला गेला आणि नेहमीप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. ज्यामधून उभारलेली इमारत ही आज भटकी जनावरे आणि मद्यपींचा अड्डा बनली आहेत.

एकीकडे जनतेचे कोट्यवधी रुपये वाया गेले आणि दुसरीकडे मिरज वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता धोक्यात आली. याची यत्किंचितही जाणीव शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील एकाही क्रीडाप्रेमीला नाही. याबाबत एखाद्या राजकीय पक्षानेही एका शब्दाने कधीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मिरज शहर आणि तालुका हा अनेक नामवंत खेळाडूंचे आगर समजला जातो. परंतु यापैकी एकाही खेळाडूला या तालुका क्रीडा संकुलाचा लाभ झालेला नाही.

निव्वळ मर्जीतील ठेकेदार पोसण्यासाठी उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलासाठी आजपर्यंत झालेला खर्च आणि त्याच्या उपयुक्ततेचा पंचनामा होणे नितांत गरजेचे आहे. या संकुलाच्या उभारणीवेळीच मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या तत्कालीन अधिष्ठाता कल्पना सुल्ह्यान यांनी याबाबत आक्षेप नोंदवला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आततायीपणामुळे निव्वळ कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी हे क्रीडा संकुल या ठिकाणी उभारले. पण यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्तित्व धोक्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणातील काही जागा तालुका क्रीडा संकुलासाठी काढून घेतली गेल्याने अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेने मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनास महाविद्यालयासाठी पुरेसे क्रीडांगण उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव मान्यता रद्द करण्याची ही नोटीस यापूर्वी दिली आहे. आगामी भविष्यकाळात याच मुद्द्यावरून मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्तित्वास धोका निर्माण होऊ शकतो.

कोट्यवधी रुपये खर्च करून हे तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले खरे; पण सध्या या क्रीडासंकुलाचा वापर भटकी जनावरे आणि स्थानिक मद्यपींसाठी सुरक्षित अड्डा म्हणून होतो. काही ज्येष्ठ मंडळी आणि अत्यंत मोजके तरुण या क्रीडांगणावर व्यायाम करताना दिसतात.

- धनंजय भिसे, क्रीडाप्रेमी, मिरज

Web Title: Sangli Stray Animals Building Hangout Alcoholics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top