

सांगली : सांगली जिल्हा परिषदेने राबवलेल्या मॉडेल स्कूल उपक्रमाचे राज्यभरात कौतुक होत आहे. आतापर्यंत शाळांमध्ये परिपूर्ण भौतिक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ मॉडेल स्कूल म्हणून भौतिक सुविधा देण्यात आघाडी घेऊन चालणार नाही तर त्याच्या सोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचीही गरज आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी गेल्या वर्षभरात नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. यातील ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रम अर्थात मॉडेल स्कूल हा सध्या चर्चेत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठी शाळांची रचना करण्यात आली आहे. तेथे शाळेसाठी आवश्यक परिपूर्ण भौतिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
सुसज्ज प्रयोगशाळा, मैदान, खेळाचे साहित्य, चित्रमय बोलक्या भिंती तयार केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १७२ शाळा पूर्ण झाल्या असून दुसऱ्या टप्प्यात १४२ शाळा मॉडेल स्कूल म्हणून तयार करण्यात येत आहेत.
गणित, इंग्रजीची भीती कायम..
साधारणपणे शालेयस्तरावरील मुलांमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयाची भीती असल्याचे दिसून येते. या दोन्ही विषयांत मोठ्या संख्येने मुले मागे असल्याचे यापूर्वी अनेक वेळा घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून दिसून आले आहे.
एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या ‘असर’ तोंडी चाचणीत गणितात ३६ टक्के तर इंग्रजीमध्ये ४३ टक्के विद्यार्थी अपेक्षित स्तरापासून मागे असल्याचे दिसून आले. याशिवाय मातृभाषा असूनही मराठीत तीस टक्के विद्यार्थी मागे असल्याचे दिसून आले.
‘गुणवत्ता सुधार’मुळे अकरा टक्के विद्यार्थ्यांची प्रगती
डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांचे बाह्यमूल्यांकन करण्यात आले होते. त्या अहवालावरून ३० दिवसांचा गुणवत्ता सुधार कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाचा परिणाम पाहण्यासाठी एप्रिल महिन्यात १६७ शाळांमधून मुलांची मराठी, गणित व इंग्रजी विषयाची ‘असर’ तोंडी चाचणी घेण्यात आली.
त्यापैकी १२९ शाळांमधून या चाचणीचे अहवाल आले. या १२९ शाळेमधून एकूण १०,१९७ विद्यार्थ्यांनी या चाचणीत सहभाग घेतला होता. गुणवत्ता सुधार कार्यक्रमामुले ११ टक्के विद्यार्थ्यांची प्रगती झालेली दिसत आहे; पण ३६ टक्के विद्यार्थी अपेक्षित स्तरापासून दूर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना कठोर प्रयत्न करावे लागतील हे उघड आहे.
गुणवत्तावाढीसाठी समर कॅम्प
मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी मॉडेल स्कूलबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
त्यासाठी सहा आठवड्यांचे समर कॅम्प घेण्यात येत आहेत. यामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असला तरी विशेष करून चौथी ते सहावीच्या विद्यार्थ्यांच्या भाषा आणि गणिताच्या मूलभूत क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
यासाठी शिक्षकांबरोबरच ग्रामस्थ तसेच महाविद्यालयीन युवक-युवती यांनाही स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे.
गुणवत्ता वाढीचे लक्ष्य शिक्षकांसमोर असले तरी शिक्षकांची अपूर्ण संख्या, त्यांच्यावरील अशैक्षणिक कामाचा भार यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीकडे लक्ष देण्यास त्यांच्या समोरही अडचणी आहेत. त्यातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष लक्ष देण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.
मॉडेल स्कूल संकल्पना काय आहे?
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवणे व अध्ययन-अध्यापनाचा दर्जा वाढवणे यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यात येत आहेत. यातून विद्यार्थ्यांचा पट वाढवणे, विद्यार्थी व शिक्षकांची गुणवत्ता वाढीस लावणे, शालेय वातावरण सुशोभित व प्रसन्न करणे, मुलांचा शारीरिक, बौध्दिक, सामाजिक व मानसिक विकास करणे, असा या मॉडेल स्कूल उपक्रमाचा उद्देश आहे.
गुणवत्ता सुधार कार्यक्रमामुळे ११ टक्के विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे. मॉडेल स्कूलमुळे जिल्ह्याचे नाव राज्यात चर्चेत आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. मराठी, इंग्रजी, गणित या विषयांमध्ये मुले मागे असल्याचे दिसते. त्यांच्यावर शिक्षक-पालक यांनी लक्ष केंद्रित केल्यास त्यांच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल.
- जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली
भौतिक सुविधेबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचीही हमी शिक्षकांकडून आम्हाला अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पहिली, दुसरी, तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता शोध परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक आणि क्रीडागुण विकासासाठीही विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि संघटनांचेही सहकार्य मिळत आहे.
- मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.