
सांगली : ऐन उन्हाळ्यातही टॅंकरला मागणी नाही
सांगली: जिल्ह्यात पाच मोठे तर ७८ लहान असे ८३ तलाव आहेत. यात सध्या तीन हजार दशलक्ष घनफूट इतका म्हणजे ३९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा यंदा १० टक्के जास्त आहे. आठ तलाव कोरडे, तर चार तलावातील पाणी मृत संचयाखाली आहे.पूर्व भागातील जत तालुक्यातील तलावात २८ टक्के, आटपाडी तालुक्यात ६० टक्के, कवठेमहांकाळ तालुक्यात ३१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी अजून तरी आलेली नाही. ती पुढील काही दिवसात लागण्याचीही शक्यता कमी आहे. केवळ प्रक्रिया राबवायची म्हणून प्रशासन टंचाई कालावधीसाठी टॅंकरसाठी निविदा प्रसिध्द होईल.
जिल्ह्यात सन २०१९ च्या महापुरानंतर टॅंकरची संख्या घटली आहे. त्यातही सिंचन योजनातून उन्हाळ्यात तलाव, तळी भरून घेत असल्यामुळे टॅंकरची मागणीच होतानाचे चित्र नाही. तरीही सन २०२१ च्या जानेवारीत काही लोकप्रतिनिधींनी टॅंकरची मागणी केल्यानंतर सिंचन योजना सुरू केल्यानंतर मागणीचा धार बोथट झाली. यंदाही सिंचन योजना सुरु आहेत. परिणामी टॅंकरसाठी केवळ कागदोपत्रीच पाठपुरावा प्रशासनाकडून केला जाणार आहे. जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पावाडी, जत तालुक्यातील संख, दोड्डनाला आणि शिराळा तालुक्यातील मोरणा या पाच मोठ्या तलावांत एक हजार ७६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवण्याची क्षमता आहे.
या तलावांमध्ये सध्या ७२९ दशलक्ष घनफूट म्हणजे ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट टळले आहे. ७८ लहान प्रकल्पात सहा हजार १५ दशलक्ष इतकी पाणीसाठवण क्षमता आहे. त्यापैकी सध्या दोन हजार २७६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. अर्थात या ७८ प्रकल्पांत ३८ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्के पाणीसाठा जास्त आहे. गतवर्षी याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात २८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.