सांगलीत तीन बेघर उभे राहिले स्वत:च्या पायावर, बेघर दिनी सुरू केले व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

यामध्ये अनेक शिकलेले, संगणक चालवता येणारे तसेच अभ्यासू आहेत. मात्र परिस्थितीमुळे ते मानसिक रोगी बनले आणि ते बेघर झाले. अशा हुशार बेघराना केंद्राचे व्यवस्थापक मुस्तफा मुजावर यांनी व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम केले आहे.

सांगली : महापालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्रातील तीन बेघरांनी आज आपल्या नवीन जीवनाची सुरुवात केली. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सावलीच्या बेघर केंद्राचे मुस्तफा मुजावर यांच्या सहकार्याने या बेघरांनी स्वत:चे व्यवसाय जागतिक बेघर दिनी सुरू केले. 

महापालिकेने शहरातील बेघरांना "सावली' देण्याच्या उद्देशाने तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या प्रोत्साहनाने या बेघर केंद्राची सुरवात केली. बेघरांना आपलेच आप्त मानणाऱ्या मुस्तफा मुजावर यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी आहे. त्यांनी बेघरांना या केंद्रामध्ये निवारा देत त्यांची सेवा केलीच, आता त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठीही ते धडपडत आहेत. या केंद्रात आज 48 बेघर आहेत. 

यामध्ये अनेक शिकलेले, संगणक चालवता येणारे तसेच अभ्यासू आहेत. मात्र परिस्थितीमुळे ते मानसिक रोगी बनले आणि ते बेघर झाले. अशा हुशार बेघराना केंद्राचे व्यवस्थापक मुस्तफा मुजावर यांनी व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम केले आहे. त्यांना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे ज्योती सर्वदे यांचेही सहकार्य मिळाले. आज जागतिक बेघर दिनी या केंद्रातील तीन बेघरांनी आपला व्यवसाय सुरू केला. एकास भाजीपाला विक्रीची हातगाडी सुरू करून देण्यात आली. अन्य दोघांना शिलाई मशीनवर काम उपलब्ध करून देण्यात आले. 

उपायुक्त स्मृती पाटील आणि प्रभाग एकच्या सभापती उर्मिला बेलवलकर, महिला बालकल्याण सभापती नसीमा नाईक, राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सर्वदे, मतीन अमीन, वंदना सव्वाखंडे, रफिक मुजावर यांच्यासह सावलीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. फळ आणि भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केलेल्या बेघराच्या गाड्यावरून उपायुक्त स्मृती पाटील यांनी फळे खरेदी करत त्याच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. यानंतर बेघर दिनानिमित्त केक कापून हा दिवस साजरा करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangli, three homeless people stood on their own feet and started a business