
सांगली जिल्हा परिषदेत सदस्यांना दिलेला शब्द पाळावा लागेल. लोक सोबत रहायचे असेल, विश्वासाचे राजकारण करायचे असेल तर बदल करावा लागेल.
सांगली ः जिल्हा परिषदेत सदस्यांना दिलेला शब्द पाळावा लागेल. लोक सोबत रहायचे असेल, विश्वासाचे राजकारण करायचे असेल तर बदल करावा लागेल. तो सुरक्षित पद्धतीने आणि साऱ्यांना विश्वासात घेऊन करू, असा प्राथमिक निर्णय आज भाजप नेत्यांची बैठकीत झाला. मिरज येथे बैठक झाली. खासदार संजय पाटील यांनी याला दुजोरा दिला.
या बैठकीला माजी आमदार, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख, रणधीर नाईक यांच्यासह भाजप नेत्यांनी हजेरी लावली. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार विलासराव जगताप, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे काही कारणाने बैठकीला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे येत्या 13 किंवा 14 तारखेला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला.
महापालिकेत महापौर निवडीवेळी भाजपला दणका बसला. राष्ट्रवादीने भाजपचे सात सदस्य फोडून महापौरपदाची बाजी मारली. महापालिकेत सरळ सत्ता असताना ती गमवावी लागली, जिल्हा परिषदेत कुबड्यांची सत्ता आहे. येथे शिवसेना, रयत आघाडी, घोरपडे गट यांची मदत घेऊन भाजप सत्तेत आहे. त्यामुळे येथे बदल करावा का, याबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांनी करावा. तो प्रदेश भाजपला सांगावा आणि त्यानंतर निर्णय घेऊ, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
त्यानुसार पहिली बैठक आज झाली. त्यात जिल्हा परिषदेतील बलाबल, कुठला गट मदत करेल, कुणाबाबत काय अडचणी आहेत, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता फोडण्यासाठी प्रयत्न करेल का, केलीच तर त्याला उत्तर काय असेल, आदी विषयांवर चर्चा झाली. बदल करताना कोण-कोण इच्छुक आहेत, त्यांच्याबाबत सदस्यांमध्ये काय वातावरण आहे, याचीही चर्चा करण्यात आली.
या बदलाबाबत भाजपच्या वरिष्ठांचे एकमत होण्यासाठी आता पुन्हा बैठक घ्यावी लागणार आहे. त्यात अंतिम चर्चा होईल. त्याआधी आमदार अनिल बाबर, माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय झाला. बदल करायचा ठरला तर हे दोन्ही नेते काय भूमिका घेणार, हा सर्वात महत्त्वाचा विषय असणार आहे.
जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाबाबत आज प्राथमिक बैठक झाली. पुन्हा आम्ही 13 किंवा 14 मार्चला भेटणार आहोत. सदस्यांना शब्द दिला आहे आणि तो पाळावा लागेल. त्यामुळे त्यावर चर्चा होईल.
- संजय पाटील, खासदार
संपादन : युवराज यादव