
वरिष्ठांच्या नजरेसमोर चारपट बिले अदा करून बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी धाडसाचे प्रदर्शन केले. आता ते अंगाशी आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या प्रतापात सहभागी असणाऱ्या मजूर सोसायट्या पुरत्या हादरून गेल्या आहेत.
सांगली ः जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नजरेसमोर फरशी घोटाळा झाला.
या घोटाळ्याची रक्कम अन्य घोटाळ्यांच्या तुलनेत कमी असेल. मात्र वरिष्ठांच्या नजरेसमोर चारपट बिले अदा करून बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी धाडसाचे प्रदर्शन केले. आता ते अंगाशी आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या प्रतापात सहभागी असणाऱ्या मजूर सोसायट्या पुरत्या हादरून गेल्या आहेत.
"सकाळ'ने आज या फरशी घोटाळा चव्हाट्यावर मांडला. 28 रुपये प्रति चौरस फूट किमतीच्या फरशा आणि ते बसवण्याचा खर्च 12 रुपये असा एकूण खर्च 40 रुपये अपेक्षित होता. वास्तविक, त्याची बिले 170 रुपयांनी अदा करण्यात आली आहेत. या बातमीने जिल्हा परिषद सदस्यांसह सर्व विभागांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना आपल्या नजरेसमोर असला प्रकार सुरू होता, याची माहिती झाली.
त्यातील बारकावे अजून चंद्रकांत गुडेवार यांच्याकडून तपासले जाणार आहे. त्यातील प्राथमिक माहितीनुसार, येथील सर्व जुन्या फरशा या काढायच्या होत्या आणि मग नवीन अंथरायच्या होत्या. त्याऐवजी जुन्या फरशीवरच नवीन फरशा बसवण्यात आल्याची माहिती आहे. त्याबाबतची काही छायाचित्रणे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत.
या एकाच कामाचे तीन तुकडे पाडण्यात आल्याचेही समोर आले आहे. हे काम 90 नव्हे तर 60 लाख रुपयांचे असल्याचे आज सांगण्यात आले. मजूर सोसायट्यांनी यात अधिकारी सांगतील त्याला "हो ला हो' प्रकार केल्याचे प्राथमिक दिसते आहे. त्यामुळे नेमके कोण अधिकारी यात दोषी आहेत, याबाबत आता चौकशी सुरू होईल. हा प्रकार थेट मुख्यालयातच घडल्यामुळे त्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
संपादन : युवराज यादव