esakal | इथे कर्मचाऱ्यांना टेबलाचा हव्यास सुटेना
sakal

बोलून बातमी शोधा

In Sangli ZP, the staff started meeting to members to prevent the transfer

"साहेब, फायली संपवायच्या आहेत. आता टेबल बदलले तर कसे व्हायचे', असा जणूकाही या लोकांनाच सगळी काळजी आहे, असा आव आणून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटी सुरु केल्या आहेत. या साऱ्यात "तोडपाणी' करणाऱ्यांचा वावर वाढू लागला आहे. 

इथे कर्मचाऱ्यांना टेबलाचा हव्यास सुटेना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः जिल्हा परिषदेत अनेक वर्षे एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया पुढे सरकत असताना आता कर्मचाऱ्यांनी "मार्च एंड'चे हत्यार उपसले आहे. "साहेब, फायली संपवायच्या आहेत. आता टेबल बदलले तर कसे व्हायचे', असा जणूकाही या लोकांनाच सगळी काळजी आहे, असा आव आणून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटी सुरु केल्या आहेत. या साऱ्यात "तोडपाणी' करणाऱ्यांचा वावर वाढू लागला आहे.

जिल्हा परिषदेतील कामाचा वेग मंद का? या प्रश्‍नाची उत्तरे वर्षानुवर्षे एकाच टेबलावर मुरलेली आणि मुरदाड झालेली यंत्रणा आहे, असा थेट निष्कर्ष नव्या पदाधिकाऱ्यांनी काढला आहे. तो जुनाच आहे. याआधीही त्यावर चर्चा झाली, मात्र पहिल्यांदाच गांभिर्याने ठाणेदार हटाव, मोहिम राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत स्वतः त्याबाबत आग्रही आहेत.

अध्यक्ष प्राजक्ता कोरे आणि उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह सभापती आशा पाटील, सुनिता पवार, प्रमोद शेंडगे आणि जन्नाथ माळी यांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तीनशेहून अधिक महत्वाचे टेबल बदलायचे, अशी चर्चा आहे. त्यात काही खात्यांतर्गत बदल्या तर काही विभागांतर्गत बदल्या होऊ शकतात. पाच वर्षाहून अधिक काळ एकाच विभागात काम करणाऱ्यांची उचलबांगडी निश्‍चित मानली जात आहे. ती कधी होणार एवढाच विषय बाकी आहे.

या स्थितीत कर्मचाऱ्यांनी चलाखीचा डाव खेळण्याचा प्रयत्न चालवला आहे. मार्च एंड आहे. कामाचा व्याप जास्त आहे. अशावेळी टेबल बदली केल्यास कामावर परिणाम होईल, असा आव आणला जात आहे. ही वेळ टाळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची बदली होऊ शकते, असाही एक अंदाज आहे. त्यामुळे बदल्या टळतील, पुन्हा त्याच टेबलावर ठाण मांडता येईल, असे कर्मचाऱ्यांना वाटते आहे. 

टेबल कामाचे अन्‌... 

जिल्हा परिषदेत आता नवीनच वाद चर्चेत आला आहे. येथे बहुतांश सर्व विभागात दोन प्रकारचे टेबल आहेत. एक कामाचा आणि दुसरा "कमाई'चा, असे सांगितले जाते. त्यापैकी "आपल्या कामाचा' टेबल मिळावा म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. त्यातून वादाच्या घटनाही घडल्या आहेत. त्या साऱ्याची खुमासदार चर्चा आहे. 

loading image