सांगली जि. प. फरशी घोटाळा : चौकशीला त्रयस्थ समिती नेमा 

अजित झळके
Saturday, 19 December 2020

जिल्हा परिषदेतील फरशी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्रयस्त समिती नेमावी, अशी मागणी आज बांधकाम समितीच्या बैठकीत करण्यात आली.

सांगली ः जिल्हा परिषदेतील फरशी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्रयस्त समिती नेमावी, अशी मागणी आज बांधकाम समितीच्या बैठकीत करण्यात आली. हा घोटाळा ज्या विभागात झाला आहे, त्याच विभागातील लोक घेऊन चौकशी कशी काय केली जाऊ शकते, असा जाब सदस्यांनी विचारला. त्यामुळे तसा ठराव करण्यात आला. 

बांधकाम समिती सभापती जगन्नाथ माळी, सदस्य संजीव पाटील, सरदार पाटील, माजी सभापती अरुण राजमाने, जयश्री पाटील, कार्यकारी अभियंता सुरेंद्र मिसाळ आदी उपस्थित होते. फरशी घोटाळ्यात जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे, असा सूर आळवण्यात आला. इतके सारे घडल्यानंतरही सभापती खुलासा का करत नाहीत? या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी कुणी केली होती? त्याबाबत तक्रार अर्ज आला आहे का? कुणा अधिकाऱ्याला वाटले म्हणून चौकशी होत आहे का? आपल्याच विभागाची चौकशी आपणच कशी करत आहोत? अशा प्रश्‍नांची सरबत्ती सभापतींवर करण्यात आली.

गहाळ फाईल प्रकरणी जाब विचारण्यात आला. त्यावर सभापती माळी यांनी या प्रकरणात कुणाची तक्रार नव्हती, असा खुलासा केला. त्यामुळे चौकशी करायचीच झाल्यास त्रयस्त समितीमार्फत करावी, त्यामुळे पक्षपात होणार नाही, त्याचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करता येईल, अशी मागणी करण्यात आली. त्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. 

जिल्हा नियोजनातून रस्ते विकासासाठी इतर जिल्हा मार्गांना 22 कोटी, तर ग्रामीण मार्गांसाठी 30 कोटी रुपये मिळणार आहेत, असे सांगण्यात आले. कोरोना कालावधीत ज्या सदस्यांनी सामूहिक विकास कार्यक्रमातील निधी वापरला नाही, त्यांना तो निधी गरजेनुसार वापरण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी संजीव पाटील यांनी केली. आटपाडी येथे वसतिगृह बांधण्याची मागणी अरुण बालटे यांनी केली. मुख्यालयापासून हे गाव दूर असल्याने तेथे त्याची आवश्‍यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

संपादन : यवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli ZP tiles scam : Dimanded Third party committee appointed to probe