सांगली डॉट कॉम : चंद्रकांतदादाचं नेमकं चुकलं कुठं ?

Sangli.com: Where did Chandrakant patil go wrong?
Sangli.com: Where did Chandrakant patil go wrong?

कॉंग्रेसची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही भाजपने पदवीधर मतदारसंघाच्या जागा जिंकण्याचं तंत्र आत्मसात केलं होतं. आता भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आली असताना नेमकं कॉंग्रेससारखं भाजपचं झालं आहे. असं का व्हावं? कुठं तंत्र चुकलं? याचं आत्मचिंतन भाजप करेल? 

भाजपची 2014 मध्ये राज्यात सत्ता आली आणि चंद्रकांतदादांचे भाग्य एकदमच उजळले...पार्टीतील ते महत्त्वाचे शक्‍ती केंद्र झाले. पश्‍चिम महाराष्ट्रात त्यांनी मेगा भरती करीत दोन्ही कॉंग्रेसला धक्‍क्‍यावर धक्के दिले. मात्र सांगली जिल्ह्यात भाजपच्या वाढीची कारणे वेगळीच आहेत ती दादांच्या लक्षात आली नसावीत. गेल्या वीस वर्षात राष्ट्रवादीच्या (जयंत पाटील यांच्या) छुपा पाठिंब्यानेच भाजप विस्तारला हे कोणीही नाकारणार नाही. पण महापालिका व जिल्हा परिषदेला भाजपने दोन्ही कॉंग्रेस विरुध्द लढूनही या दोन महत्त्वाच्या सत्ता येथे हाती घेतल्यानंतर दादांचा वारु सुसाट सुटला.

त्यांनी आधी जयंतरावांना आणि नंतर शरद पवार यांना डिवचताना राष्ट्रवादीची छुपी रसदच तोडून टाकली. पवारांच्या राजकीय उंचीबद्दल किंवा जयंतरावांना विधानसभेलाच संपवले असते अशी केलेली बडबड पाहता कोणीही ही विधाने सध्याच्या राजकीय धुमश्‍चक्रीत परिपक्वपणाची मानणार नाही. बडबडीचा तो अंधाधुंद गोळीबारच होता. 

दुसरा मुद्दा भाजप-संघ परिवार वर्षानुवर्षे या निवडणुकांसाठी अतिशय हुशारीने तयारी करायचा. पडद्याआड राहून हजारो स्वयंसेवक ही कामगिरी फत्ते पार पाडायचे. नेमके हेच अरुण लाड यांनी गेल्या तीन वर्षात गेले. अगदी कोरोना काळातही त्यांची नोंदणी मोहिम सुरु होती. अगदी शेवटच्या तीन दिवसात भाजपने पुण्यात तीस हजारांची नोंदणी केल्याने जयंतराव पाटील अस्वस्थ झाले होते. मात्र हे ससा कासवाच्या शर्यंतीसारखे झाले. एक नक्की की भाजपच्या तंत्राने लाडांनी भाजपचा पराभव केला. मध्यंतरी तर या निवडणुका पुढे ढकलायला हव्यात असेही विधान चंद्रकांतदादांनी केले होते.
 

त्यावेळी ते तयारीत मागे पडल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे ऐनवेळी संग्राम देशमुख यांना घोड्यावर बसवावे लागले. हा संघ परिवारासाठी धक्काच होता. मराठाच उमेदवार हवा. तो आर्थिकदृष्ट्या मजबुत हवा हे निकष पक्षनेतृत्वाने लावले. या गदारोळात चंद्रकांत तपभरापुर्वीची आपली आर्थिक ताकद विसरलेले असावेत. ते या मतदारसंघातून पुर्वी ब्राह्मण उमेदवार निवडल्याचेही ते विसरले असावेत. त्याचे पडसाद संघ शिस्त मोडून सोशल मिडियावरुन व्यक्त झालेल्या प्रतिक्रियामधून दिसून आले. घराणेशाही, साखर सम्राट असे मुद्दे मांडणाऱ्या भाजपचे हे वर्तन म्हणजे भाजप कॉंग्रेसमय झाल्याचेच उदाहरण. 

भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रात आता पाय रोवले असताना हा पराभव कसा हा प्रश्‍नही आता उपस्थित होत आहे. मात्र इथे सत्तेचा नव्हे तर निवडणूक तंत्राचा खरा उपयोग असतो हेच भाजप विसरला. भाजप-संघ परिवाराची ही रणनीती गेल्यावेळी सारंग पाटील यांनी पूर्ण हेरली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यावेळी लाड यांची बंडखोरी नसती तर चंद्रकांतदादा दिसलेच नसते असं शरद पवारच एका कार्यक्रमात म्हणाले होते. पण मागचा निसटता विजय असूनही राज्य सांभाळायला निघालेले चंद्रकांतदादा आपले घर सांभाळायचेच विसरले. गेल्यावेळी मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला होता. मात्र ते अपघाताने झाले होते. यावेळी अशी मतविभागणी जाणिवपूर्वक करण्यावर भाजपचा भर राहिला. मात्र लाडांची तयारीच एवढी होती की हे तंत्रही फारसे टिकले नाही. 

या निकालाचा राज्यातील बदललेल्या राजकीय वातावरणाशी जोडता येईल. पदवीधर व शिक्षकमध्ये भाजपचा सर्वात मोठा गड असलेला नागपूरदेखील यावेळी ढासळल्याने एकटे चंद्रकांतदादाच नाही तर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे सर्वच दिग्गज देखील कमी पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता जशी भाजपची कॉंग्रेस झाली आहे तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भाजपचे पदवधीर-शिक्षक मतदारसंघाचे तंत्र आत्मसात करताना दिसत आहेत. हा बदल नोंदवला पाहिजे.

तिघे एकत्र लढले म्हणून आमचा पराभव झाला...किंवा आम्हाला एक जागा तरी मिळाली; शिवसेनेला काय मिळाले अशा स्वरुपाचे विश्‍लेषण करण्यात भाजप नेतृत्व अडकले तर मात्र परतीचे दोर स्वतःच कापण्यासारखे ठरेल. भाजपवाल्यांना आत्मचिंतन करा असे सांगण्याची गरज नसते. कारण त्यांचा चिंतनावर मोठा भरत असतो म्हणे. हे तसे त्यांच्या आवडीचं काम. एव्हाना संघ शिस्तीत ते सुरू झालेही असेल ! 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com