सांगलीकरांचं ठरलं...सार्वजनिक मंडळांचा बाप्पा यंदा घरातच 

शैलेश पेटकर 
Wednesday, 19 August 2020

यंदाचा गणेशोत्सव घरातच करण्याच्या पोलिसांच्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व मंडळानी होकार कळवला आहे.

सांगली : ठरलं... यंदाचा गणेशोत्सव घरातच करण्याच्या पोलिसांच्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व मंडळानी होकार कळवला आहे. त्यामुळे रस्त्यावर मंडप घालून सार्वजनिक उत्सव केला जाणार नाही. या निर्णयामुळे पोलिस दलावर यंत्रणा बंदोबस्ताचा ताण घटणार आहे. त्यांनाही आपल्या घरात गणेशोत्सवाला हजेरी लावता येणार आहे. 

कोरोना संकट काळात यंदाचे सर्वच उत्सव एक तर रद्द झालेत किंवा साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रा, पंढरपूरची वारी, जत्रा-यात्रा, उत्सव सर्व रद्द झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाबाबत राज्य शासना आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. जिल्हा पोलिसांनी या वर्षी सार्वजनिक मंडळांनी अध्यक्ष किंवा सदस्याचा घरी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन केले. त्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले. त्यानंतर त्याची जिल्हाभर चर्चा झाली आणि सर्व मंडळांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

पोलिस दल वर्षभर तणावाखाली असते. उत्सव येण्यापूर्वीपासून ते वर्दी अंगावर चढवून रस्त्यांवर उभे असतात. चोवीस तास ड्युटी बजावली जाते. दोन वेळचे जेवण उभ्याउभ्या करावे लागते. या साऱ्यात घरातील उत्सवात त्यांना सहभागी होता येत नाही. प्रचंड ताण या खाकी वर्दीतील पोलिसांवर असतो. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोवीस तास पोलिसांना अलर्ट राहवे लागते. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव घरगुती स्वरूपातच होणार आहे. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी केलेल्या आवाहनास जिल्ह्यातील मंडळांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव तणावमुक्त होईल. कोरोना लढाईसाठी पोलिस दलाची ताकद वाढली जाणार आहे. 

दुसऱ्या बाजूला पोलिसांना घरातली बप्पांच्या आरतीसाठी हजेरी लावता येणार आहे. उत्सावात यापूर्वी बाहेरील राज्यातून पोलिसांचा तुकडी मागवावी लागत होती. बाप्पांच्या आगमानापासून विसर्जनापर्यंत चोवीस तास बंदोबस्त ठेवावा लागत होता. त्यात मिरजेतील चालणाऱ्या 36 तासांच्या मिरवणूकीचा ताण पोलिसांवर असायचा. हुल्लडबाजांवर नजर ठेवत कारवाईचा बडगाही उगारावा लागायचा. पोलिसांना त्यांच्या घरातील उत्सवात सहभागी होता येत नसे. आता सांगली संस्थान आणि तासगावच्या मानाच्या गणपतीचीही मिरवणूक यंदा होणार नाही. कोणतीही मिरवणूक नसेल. यंदा पोलिस दलासाठी तणावमुक्त वातावरण असेल. 

पोलिस पाटलांनी कळवली भूमिका 

जिल्ह्यातील गावागावातील पोलिस पाटलांनी सार्वजनिक मंडळांची भूमिका पोलिसांना कळवावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्वच मंडळांनी यंदा अध्यक्षांच्या घरी मुर्तीची प्रतिष्ठापना करू, असे कळवले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मंडळांना यंदा परवानगी काढण्याचीही आवश्‍यकता उरलेली नाही. त्यांनी सर्व ती खबरदारी घेऊन उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

पण जीवही महत्वाचाच... 

सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा करायचा नाही, या एका निर्णयामुळे मंडप, डेकोरेटर्स, लाईटमन, वाद्यवृंदवाले, साऊंट सिस्टिमवाले या साऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. लग्नसराई बंद पडल्याने आधीच कंबरडे मोडले होते, त्यात उत्सव घरगुती स्वरुपात आल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे, मात्र जीवही महत्वाचा आहे. 

यंदाचा गणेशोत्सव घरगुती स्वरुपातच करावा, हे पोलिस दलाचे आवाहन "सकाळ'ने सर्वत्र पोहचले. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यंदाचा उत्सव साधेपणाने करून कोरोनाला मात देण्यासाठी साऱ्यांनी एकजूट केली आहे. पोलिस दल या काळात कोरोनाच्या नियंत्रणासाठी अधिक वेळ देऊ शकतील.'' 

- सुहैल शर्मा, पोलिस अधीक्षक, सांगली 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanglikars decided ... Bappa of public circles is at home this year