
सांगलीकरांना मिळणार वारणेचे पाणी
सांगली: दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांनी सांगलीला वारणा नदीचे पाणी देण्याची योजना आखली होती. काही कारणाने ती रद्द झाली. त्यामुळे वारणेचे कृष्णेच्या तुलनेत शुद्ध असलेले पाणी पिण्यापासून सांगलीकर वंचित राहिले. आता पुन्हा एकदा जलसंपदा विभागाच्या सिंचनासाठीच्या नव्या धोरणामुळे सांगलीकरांना वारणा नदीचे पाणी मिळणार आहे. सध्या आहे हीच उपसा आणि शुद्धीकरण यंत्रणा वापरून ते पुरवता येणार आहे, हे विशेष.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या उपसा केंद्रातील पाणीसाठा वाढावा, पूर नियंत्रणासाठी उपयोग व्हावा, यासाठी म्हैसाळ येथे छोटे धरण (बॅरेज) बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे. सध्या तेथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. तो काढला जाणार आहे. त्याचवेळी सांगलीतील कृष्णा नदीवरील बंधारा काढून टाकला जाईल. सध्या सांगलीतील बंधाऱ्यावर कृष्णेचे पाणी अडते, त्यामुळे होणाऱ्या पाणीसाठ्याचा शुद्धीकरण केंद्राकडे उपसा करून ते पाणी पिण्यासाठी पुरवले जाते. आता हा बंधारा निघाल्यानंतर उन्हाळ्यात डिग्रज बंधाऱ्यावर कृष्णेचे पाणी थांबेल तेंव्हा कृष्णा नदीचं पात्र सांगलीच्या बाजूला कोरडे पडेल काय?, अशी शंका उपस्थित केली जात होती. त्याला उत्तर म्हैसाळ येथील छोटे धरण असणार आहे.
वारणा नदीचा हरिपूर येथे कृष्णा नदीशी संगम होते. तेथून पुढे अंकलीकडे बारमाही वाहत्या कृष्णेत बहुतांश पाणी वारणा नदीचे असते. तेच पाणी म्हैसाळमध्ये अडवले जाईल. त्याचा साठा सांगलीपर्यंत येईल. परिणामी उन्हाळ्यात कोयना धरणातून पाणी सोडले नाही तरी सांगलीत पाण्याची टंचाई भासणार नाही. वारणा धरणाच्या नियंत्रणावर सांगलीला पाणी पुरवठा शक्य होईल. म्हैसाळ विस्तार पाणी योजनेसाठी सध्या सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले आहे. त्यामुळे म्हैसाळपर्यंत कृष्णा आणि वारणा नदीचे मुबलक पाणी उन्हाळ्यात उपलब्ध असेल.
सांगली बंधारा काढल्यानंतर पूर्ण पाणीसाठ्यात सांडपाणी मिसळण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यासाठी सांगलीतील चार नाल्यांवर पंपिंग स्टेशन आणि एचटीपी स्टेशनचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. त्यामुळे जे सांडपाणी मिसळते आहे ते एकत्रित करून शुद्धीकरण करणे शक्य होईल. ती सुमारे साठ कोटी रुपयांची योजना आहे. त्याआधी आम्ही गटार योजना पूर्ण करून घेत आहोत. टप्प्याटप्प्याने हा प्रश्न सोडवावा लागेल.
- दिग्विजय सूर्यवंशी, महापौर, सांगली
सांगली बंधारा काढल्यानंतर पूर्ण पाणीसाठ्यात सांडपाणी मिसळण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यासाठी सांगलीतील चार नाल्यांवर पंपिंग स्टेशन आणि एचटीपी स्टेशनचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. त्यामुळे जे सांडपाणी मिसळते आहे ते एकत्रित करून शुद्धीकरण करणे शक्य होईल. ती सुमारे साठ कोटी रुपयांची योजना आहे. त्याआधी आम्ही गटार योजना पूर्ण करून घेत आहोत. टप्प्याटप्प्याने हा प्रश्न सोडवावा लागेल.
- दिग्विजय सूर्यवंशी, महापौर, सांगली
Web Title: Sanglikars Warne Dam Water
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..