Sanket Sargar : राष्ट्रकुल विजेता संकेत दोन वर्षांनंतर घरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanket Sargar

Sanket Sargar : राष्ट्रकुल विजेता संकेत दोन वर्षांनंतर घरी

सांगली : राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा वेटलिफ्टिंगपटू संकेत सरगर दोन वर्षांनंतर घरी आला. स्पर्धेदरम्यान झालेली जखम ताजी असतानाही तो वडिलांसमवेत भजीचा गाडा व पानटपरीचा व्यवसाय सांभाळू लागला आहे, जुन्या आठवणीत रमला आहे. इथे आल्यानंतर दोन दिवसांत त्याचा भ्रमणध्वनी सतत खणखणतोय. शुभेच्छांचा वर्षाव झेलतोय. डोक्यात कोणतीही हवा गेली नसलेला हा गुणी खेळाडू पुढील ऑलिंपिकमध्ये यश मिळवण्याची स्वप्नेही रंगवतोय. त्यादृष्टीने क्रीडा मार्गदर्शक व वैद्यकीय तज्‍ज्ञांच्या सल्ल्यानुसार सरावही करतोय.

बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे ३० जून रोजी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत संकेतने रौप्यपदक मिळवत खऱ्या अर्थाने बोहणी केली. त्याच्या यशानंतर भारताच्या वाट्याला अनेक पदके आली. एका अर्थाने हा ‘शुभ’संकेत असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत त्याचे पहिला पदक विजेता म्हणून खास अभिनंदन केले होते. तब्बल ५२ वर्षांनी जिल्ह्याच्या सुपुत्राने हा मान मिळवल्याने तो ‘स्टार’ बनला आहे. स्पर्धेदरम्यान पाचव्या फेरीत वजन उचलताना अचानक त्याच्या उजव्या हाताचा कोपरा दुखावला. लिगामेंट तुटून इजा झाली. दहा टक्के लिगामेंट कार्यरत असतानाही यशासाठी त्याने शरीरांतर्गत दुखापतीकडे दुर्लक्ष केले. काहीही झाले तरी सुवर्णपदक मिळवायचेच, या निश्‍चयाने त्याने सहाव्या प्रयत्नात २४८ किलो वजन उचलले. मात्र दुखापतीमुळे एक किलोचा फरक पडला. शेवटी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याची त्याच्या मनात खंतही आहे.

स्पर्धेनंतर त्याच्यासमोर दुखापतीतून बाहेर पडण्याचे आव्हान होते. लंडनस्थित डॉ. अली नुराणी, डॉ. रॉजर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (साई) त्यासाठी ३० लाखांची तरतूद केली आहे. आजवर २२ लाखांचा खर्च झाला आहे. गंभीर जखम भरून येण्यासाठी अजूनही सात महिने लागणार आहेत. भारताच्या टीमचे फिजिओथेरपिस्ट डॉ. हरियाली बारुट, प्रशिक्षक विजय शर्मा, प्रमोद शर्मा यांच्या आधाराने तो दुखापतीतून बाहेर पडत आहे. दर १७ दिवसांनी त्याच्याशी तज्‍ज्ञ, डॉक्टर व्हिडिओ कॉलवरून संपर्क साधून आढावा घेत आहेत. सध्या तो कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या आष्टा येथील आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालयात एम. ए. (भाग २) शिकत आहे. महाविद्यालयाने सहकार्य केल्याचे तो सांगतो.

‘मदत जाहीर; हाती दमडीही नाही’

राष्ट्रकुल स्पर्धेत संघर्षातून संकेतने यश मिळवल्यानंतर अनेकांनी मदतीची घोषणा केली. आई-वडिलांचे सत्कार झाले. बुकेंचा ढीग लागला. प्रत्यक्ष अनेकांनी अभिनंदन करून फोटोसेशन केले. आमदार, खासदार, जिल्हा परिषद, महापालिकेसह राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांनी मदतीच्या घोषणा केल्या; मात्र आजवर एक-दोन अपवाद वगळता दमडीचीही मदत झाली नसल्याची खंत वडील महादेव सरगर यांनी व्यक्त केली.

आई-वडिलांसह हितचिंतकांच्या आशीर्वादाने यश मिळाले. बहीण काजोलच्या यशासाठी वडिलांना कर्जबाजारी व्हावे लागले. मदतीच्या घोषणा झाल्या; मात्र प्रत्यक्ष हाती शून्य आहे. दुखापतीमुळे सरावावर मर्यादा आहेत. तब्येत पूर्ववत झाल्यानंतर ऑलिंपिकच्या दृष्टीने कसून सराव करणार आहे.

- संकेत सरगर, रौप्यपदक विजेता, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

टॅग्स :Paschim maharashtra