सांगली जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच 9 फेब्रुवारीला ठरणार

विष्णू मोहिते
Tuesday, 2 February 2021

सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच निवडी 9 फेब्रुवारीला होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज जाहीर केले.

सांगली : जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच निवडी 9 फेब्रुवारीला होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज जाहीर केले. जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या सर्व गावांत एकाचवेळी सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने प्रथमच जाहीर केला आहे. 

जिल्ह्यात 699 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानंतर सरपंच निवडीच्या तारखेकडे जिल्ह्याचे लक्ष होते. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीबाबत निर्णय घेतला. यासाठी इच्छुक सदस्यांनी आपल्या गट नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. गावांमध्ये गावचा कारभार सुरळीत व्हावा, यासाठी सरपंचपद वाटून घेण्याचा निर्णयही काही गावांत झाल्याची चर्चा आहे. गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनीच असा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यातील 699 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत झाल्यामुळे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे आता गावागावांत चर्चा सुरू होती. आता सरपंच, उपसरपंच निवडीची तारीख जाहीर झाल्यामुले हालचाली गतिमान झाल्या आहेत.

आरक्षित राखीव जागांवर सरपंचपदाचे इच्छुक स्पर्धक कमी, तर खुल्या आणि महिलांसाठी राखीव जागांवर इच्छुकांची संख्या मोठी आहे. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवर सुरू झाले आहेत. इच्छुकांची मोर्चेबांधणी, विरोधी गटातील सदस्यांशी संपर्क, तोडफोडीच्या घटना यापुढे दहा दिवस चालू राहणार आहेत. 

तालुकानिहाय गावांची संख्या 
पलूस- 14, कडेगाव- 9, तासगाव-39, कवठेमहांकाळ-11, जत- 30, खानापूर- 13, आटपाडी-10, मिरज- 22, पलूस-02, कडेगाव-02  

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch and Deputy Sarpanch of Sangli district will be elected on February 9