साताऱ्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान, वाढत्या आकड्यांमुळे काळजात धस्स

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कराड तालुक्यातील शामगाव येथील एक, पाटण तालुक्यातील धामणीतील एक यासह कोरेगाव, खटाव वाई, फलटण ,जावली, सातारा व खंडाळा तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशीरा कोरोनाबाधित 16 रुग्णांची भर पडली. दिवसभरात 20 रुग्ण वाढल्याने एकिकडे लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात असताना कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्याने प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. वाढलेल्या रूग्णांमध्ये कराड तालुक्यातील शामगाव,  पाटण तालुक्यातील धामणी यासह कोरेगाव, खटाव, वाई, फलटण, जावली, सातारा व खंडाळा तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील  कोरोनाबधितांची संख्या 201 झाली आहे.  

सातारा जिल्ह्यात  कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे.  त्या तुलनेत कोरोना मुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण जास्त  कृष्णा हॉस्पीटल, सह्याद्री हॉस्पीटल, सातारा सिव्हिल हॉस्पिटल आणि कराड फलटण येथील रुग्णालये ही कोरोनाबाधितांसाठी वरदान ठरली आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यापासुन जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. कराड तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथे गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित सापडले नसल्याने तेथील साखळी तुटल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे तेथे मोठा दिलासा मिळाला आहे. 

 कराड तालुक्यात सध्या म्हासोली येथे नवी साखळी निर्माण झाली आहे. तेथे आत्तापर्यंत १२ कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहेत. तर उर्वरीत निकट सहवासीत आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान कराड तालुक्यातील इंदोली, भरेवाडी, मेरवेवाडी, खालकरवाडी येथे प्रवास करुन आलेल्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सर्व नवीन रुग्ण आहेत. दरम्यान आज गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह सापडले तर रात्री त्यामध्ये आणखी 16 रुग्णांची भर पडली. दिवसभरात 20 रुग्ण वाढले. 

आऱोग्य विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालावरुन कराड तालुक्यातील शामगाव येथील एक, पाटण तालुक्यातील धामणीतील एक यासह कोरेगाव, खटाव वाई, फलटण ,जावली, सातारा व खंडाळा तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. वाई तालुक्यात आतापर्यंत एकही रूग्ण सापडलेला नव्हता आज वाई तालुक्यानेही नंबर लावला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या वाढून 201 झाली आहे.  

आता सातारकरांसह जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता पुन्हा वाढली आहे.    संबंधितांच्या सहवासीत व निकट सहवासीत यांना तपासणीसाठी ताब्यात घेवुन त्यांना रुग्णालयात पाठवण्याची कार्यवाही आऱोग्य विभागाने सुरु केली आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधित गावातील रस्ते व परिसर सील करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara : 20 More Corona Infected Patients Found In District Today