साताऱ्यामधील कलावंत ‘वेबसिरीज’च्या प्रेमात..!

साताऱ्यामधील कलावंत ‘वेबसिरीज’च्या प्रेमात..!

सातारा - कॅमेऱ्याचे आकर्षण कोणाला नसते. लहानगं पोरगंही कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर ‘लुक’ देतं हे आपण घराघरांत पाहतो. नटराजाची पूजा करणाऱ्या कलावंताला तर ‘कॅमेऱ्या’ला सामोरे जाणे ही ध्येयपूर्तीच असते. नेमकी हीच ध्येयपूर्ती ‘वेबसिरीज’च्या माध्यमातून नजीकची वाटू लागल्याने साताऱ्यातील कलावंतही सध्या ‘वेबसिरीज’च्या प्रेमात पडल्याचे दिसते. सुर्की, हंबीरबापू, भाऊ साळुंखे, क्वाटर नाना... अशा पात्रांच्या नावाने कलावंतांची वाढणारी ओळख ही त्याचीच एक परिणती. 

एकांकिका स्पर्धा, नाटक, राज्य नाट्य स्पर्धा, मुंबईत स्ट्रगल आणि मग चान्स मिळाला तर मोठा पडदा हे कलावंतांचे ध्येय असते. त्यासाठी युवापिढी धडपडत असते. अलीकडे अभिनय क्षेत्रातील चढती भाजणी काहीशी बदलली आहे. मलमली आणि चंदेरी या दोन पडद्यांमध्ये दूरचित्रवाणी मालिकांची भुरळ भल्याभल्यांना पडली. दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनही याला अपवाद नाही. दूरचित्रवाणी मालिकांचे पुढचे पाऊल म्हणून ‘वेबसिरीज’ आल्या आहेत. संधीची सहज उपलब्धता, त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन साताऱ्यासारख्या छोट्या शहरातील कलावंत वेब मालिकांच्या प्रेमात पडले आहेत. 

‘सिरीज’ची मालिका!
गेल्या वर्षभरात मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रसिद्ध झालेले हे माध्यम आहे. दूरचित्रवाणीचे हे पुढचे पाऊल समजले जाते. ‘वेबसिरीज’ ही दूरचित्रवाणीवरील मालिकेसारखी मालिका असते. आठवड्यातून एकदा-दोनदा तिचे भाग प्रसिद्ध होतात. किमान दहा ते जास्तीत जास्त २० मिनिटांपर्यंत एक भाग चालतो. दूरचित्रवाणी मालिकेसारखे त्याला कथानक असते. प्रत्येक भागात मागील कथानक पुढे नेले जाते. अथवा प्रत्येक भागात त्याच व्यक्तिरेखा, पार्श्‍वभूमीही तीच घेऊन नवीन विचार, गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात. 

वेबसिरीज कशी पाहतात...
‘यु ट्यूब’वर या मालिका अपलोड केल्या जातात. मालिकेच्या पुढील भागाचे नोटीफिकेशन (सूचना) सदस्यांना पाठवले जाते. शिवाय सर्च करूनही ते पाहता येते. सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वेब मालिका तयार करण्याचा ट्रेंड आला. साताऱ्यातील कोरी पाटी प्रॉडक्‍शनचं ‘गावाकडच्या गोष्टी’ या पहिल्यावहिल्या वेबमालिकेने रसिकांचे लक्ष वेधले. जवळपास १८ भाग प्रसिद्ध झाले. या मालिकेला दर्शकांची संख्या इतकी मोठी होती, की ‘गावाकडच्या गोष्टी’चे दुसरे पर्व लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘गाव लय झ्याक’च्या  यशानंतर जमीर आतार आणि डॉ. नीलेश माने ‘कंदी पेढे’ ही मालिका आणत आहेत. ‘गाव लय झ्याक’ने अवघ्या चार महिन्यांत सव्वालाख ‘सबस्क्रायबर’चा टप्पा गाठला आहे. 

दहा ते ३० हजारांपर्यंत खर्च 
जिल्ह्यातील इतर शहरांतून तयार झालेल्या गावठी मॅटर, भानगडवाडी डॉट कॉम या काही वेब मालिका चांगल्या चर्चेत आहेत. झकास प्रॉडक्‍शनची नवीन मालिका लवकरच दर्शकांच्या भेटीसाठी येत आहे. सर्वसाधारणपणे एका भागासाठी दहा ते ३० हजारांपर्यंत खर्च येतो. निर्माता खर्चाचा भार उचलतो. यु ट्यूबवर मालिका अपलोड झाल्यानंतर त्याला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावर म्हणजे ‘व्ह्यूवर’च्या संख्येने यु ट्यूब चॅनलकडून उत्पन्न मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com