esakal | Video : सातारा जिल्ह्यातील दुकानदारांसाठी महत्वाची बातमी

बोलून बातमी शोधा

Video : सातारा जिल्ह्यातील दुकानदारांसाठी महत्वाची बातमी

सण, यात्रा व उत्सवाचे अनुषंगाने जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत जिल्ह्यात जमाव व शस्त्रबंदी आदेश लागू केला आहे. 31 मार्चच्या रात्री बारापर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकत्र जमाव करण्यास प्रतिबंध लागू झाला आहे. 

Video : सातारा जिल्ह्यातील दुकानदारांसाठी महत्वाची बातमी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रासह दोन किलोमीटर परिसरातील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी काढला आहे.
 
त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवरील सर्व हॉटेल व फार्म हाऊसचे बुकिंग, तालीम, मसाज व स्पा सेंटर, तसेच महामार्गावरील मिठाईची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आज काही आदेश दिले आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील शहरी भागातील म्हणजेच नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र व त्यालगतचे दोन किलोमीटर परिसराच्या क्षेत्रातील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने (किराणा, भाजीपाला-फळे, बेकरी, दूध, औषध) वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने (कपडे, ज्वेलरी, हार्डवअेर ऍण्ड पेंटस्‌, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फर्निचर, शू मार्ट, स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, बिल्डिंग मटेरियल व इतर सर्व प्रकार) आठवड्यातून फक्त सोमवार व गुरुवार या दोनच दिवशी चालू राहतील. इतर सर्व दिवशी ही दुकाने पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पानपट्या पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवरील सर्व हॉटेल व फार्म हाऊसचे बुकिंग, तालीम, मसाज व स्पा सेंटर, तसेच महामार्गावरील मिठाईची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे. सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेत थुंकल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेने संबंधित व्यक्तीस 200 रुपये दंड वसूल करण्याची कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गालगतची सर्व कंदी पेढे व मिठाई विक्रीची दुकाने, जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळ क्षेत्रातील (कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई, कोयनानगर) हॉटेल, रिसॉर्ट, धाबे, टुरिझम फार्म हाऊस आदी व्यावसायिकांना स्थानिक, तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे, पर्यटकांचे ऑनलाईन, तसेच प्रत्यक्ष बुकिंग घेण्यास रविवारपासून (ता. 22) ते 31 मार्चपर्यंत सक्त मनाई करण्यात आली आहे. याच कालावधीत जिल्ह्यातील सर्व निवासी तालीम व स्पाही (मॉलिश सेंटर) बंद ठेवावी लागणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही ओदशात म्हटले आहे. 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांना रस्त्यांवर मोकळे सोडून त्यांना अन्न, पाणी व निवारा या मूलभूत बाबीपासून वंचित ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. 
दरम्यान, सण, यात्रा व उत्सवाचे अनुषंगाने जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत जिल्ह्यात जमाव व शस्त्रबंदी आदेश लागू केला आहे. 31 मार्चच्या रात्री बारापर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकत्र जमाव करण्यास प्रतिबंध लागू झाला आहे.