कोरोनाला हरवायचेय? लिहा रोजनिशी

फिरोज तांबोळी
शुक्रवार, 22 मे 2020

काळजी घेऊनदेखील गावात दुर्दैवाने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलाच तर त्याच्यावर उपचार करण्याबरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधाशोध करणे या रोजनिशीमुळे सहज शक्‍य होईल. परिणामी आता गावात कोरोनाचा शिरकाव रोखण्याबरोबरच भविष्यात गावचे स्वास्थ्य चांगल्या प्रकारे टिकविण्यासाठीचाही विचार केला जात असल्याचे दिसत आहे. 

गोंदवले (जि. सातारा) : क्‍वारंटाइन तर व्हाच, परंतु तुम्हाला कोण आणि तुम्ही कोणाला भेटला, याची नोंदसुद्धा रोजनिशीत कराच. हा आर्मी फंडा वापरून कोरोना हद्दपार ठेवण्यासाठी व बाधित रुग्ण सापडलाच तर त्याच्यासह त्याच्या संपर्कातील लोकांवरही तातडीने उपचार करणे सहज शक्‍य होणार आहे. सैन्यदलात योजलेल्या हा खबरदारीचा पर्याय करण्याचा सल्ला संपत काटकर या सैनिकाने किरकसालकरांना देताच गावकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. 

किरकसालने शासनाच्या निर्देशाप्रमाणे वेळोवेळी बदल करून गाव अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे. बाहेरून गावात येणाऱ्यांना क्‍वारंटाइन करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अधिकची काळजी घेण्याच्यादृष्टीनेही पावले उचलली आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दलातदेखील काळजी घेतली जात असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले. सैन्यदलात इतर उपाययोजनांसह रोजनिशी लिहिण्याचा आदेश जवानांना देण्यात आला आहे. यामध्ये रोज आपण कोणाला किंवा कुणी आपल्याला कधी, कुठे आणि कोणत्या कारणासाठी भेटलो, याची तपशीलवार माहिती लिहून ठेवली जाते. तद्वतच क्‍वारंटाइन किंवा दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांनी रोजनिशी लिहिल्यास कोरोनाबाधित व्यक्तीच्या सहवासातील व्यक्तींची माहिती तातडीने मिळू शकेल. सैन्यदलातील ही योजना काटकर यांनी माजी सरपंच अमोल काटकर यांना सांगितल्यानंतर किरकसालमध्ये क्‍वारंटाइन असलेल्या लोकांना अशी रोजनिशी लिहिण्याचे बंधन घालण्यात आले आहे. याशिवाय गावातील इतर ग्रामस्थदेखील उत्स्फूर्तपणे अशी रोजनिशी लिहित आहेत. काळजी घेऊनदेखील गावात दुर्दैवाने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलाच तर त्याच्यावर उपचार करण्याबरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधाशोध करणे या रोजनिशीमुळे सहज शक्‍य होईल. परिणामी आता गावात कोरोनाचा शिरकाव रोखण्याबरोबरच भविष्यात गावचे स्वास्थ्य चांगल्या प्रकारे टिकविण्यासाठीचाही विचार केला जात असल्याचे दिसत आहे. 

""कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलात रोज सविस्तर डायरी लिहून खबरदारी घेतली जाते. हेच प्रत्येक गावातील लोकांनीसुद्धा करण्याची आता वेळ आली आहे.'' 
-संपत काटकर, माजी सैनिक, किरकसाल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara To Defeat Coronavirus Write Daily Notes