आपण पॉझिटिव्ह तर नाही ना, या विचाराने ते रात्रभर झोपलेच नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

"कोरोना'चे संकट व त्याची साखळी किती गंभीर आहे, याची जाणीव सर्वांना होऊ लागली आहे. लोकांना रोज घसा ओरडून सांगूनही न ऐकणारे आता तरी शहाणे होतील, एवढंच यानिमित्ताने लोक सांगू लागले आहेत. 
 

कास (जि.सातारा)  : एरव्ही शासकीय यंत्रणेलाही जावळी तालुक्‍यात आणि विशेषत: बामणोलीच्या दऱ्याखोऱ्यात पोचताना दमछाक होते, तेथे शासकीय संचारबंदी, जमावबंदीची तीव्रता तशी कमीच म्हणायची. पण, निझरे गावातील ग्रामस्थ कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यावर साऱ्या तालुक्‍यातच सामसूम दिसत आहे.
 
रविवारी सायंकाळी चारनंतर जावळी तालुक्‍यातील विशेषत: मेढा भागातील वातावरण एकदम बदलले. जिल्हाधिकारी, पोलिसांच्या पिंजरा वाहनातील लाठीधारक जवान व इतर वाहनांचा ताफा मेढ्यात आला आणि काहीतरी विपरित घडल्याची चाहूल जावळीकरांना लागली. 

पंचायत समितीत बैठक होवून हा सर्व ताफा मेढ्याच्या दक्षिण विभागातील निझरे गावाकडे धावला आणि चर्चांना ऊत आला. सायंकाळी सहानंतर निझरे गावातील व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती बाहेर पडली आणि जावळीकरांच्या काळजात धस्स झाले. सोशल मीडियावीर काहीही बरळू लागले तर इकडे प्रशासन गावात झपाटून कामाला लागले.
 
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गावागावांत आलेल्या मुंबईकर मंडळींकडे सगळे संशयाने पाहू लागले. एरवी प्रशासन व इतर सर्व घटक घरात गप्प बसा म्हणून सांगत असताना न ऐकणारे सर्वच गप्पगार झाले. मुंबई, पुण्यात धुमाकूळ घालणारा कोरोना ग्रामीण भागात कशाला येतोय, या भ्रमात असणारी सर्वच मंडळी अवाक्‌ झाली. जगभरात थैमान घालणारा आजार आपल्या दारात आल्याच्या भीतीने माणसे घरांत बसली. 
मेढा बाजारपेठेतही रोजच्यापेक्षा जास्त शुकशुकाट व उदासपणा जाणवत होता. निझरे गावातील स्मशान शांतता तर "कोरोना'चा डर काय आहे, हे सांगत होती. यामध्ये सर्वांत वाईट वेळ आली ती पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची.
 
प्रशासनाने शोध सुरू केल्यानंतर अनेक गावांत बाधित व्यक्‍तीचा येनकेन प्रकारे संपर्क आलेल्या मंडळींची वाईट अवस्था झाली. जे जेवत होते, त्यांचा घास घशातच राहिला. घरातली चिलीपिली रडायला लागली. आपण पॉझिटिव्ह तर नाही ना, या विचाराने संबंधित मंडळींना रात्रभर झोप लागली नाही. तर या लोकांच्या संपर्कात आलेल्यांचीही पाचावर धारण बसली. 
आत्ताच्या आता निघा, असे निरोप येऊ लागले आणि लोकांची पळापळ सुरू झाली. कुटुंबातील व्यक्ती व काही इतर व्यक्ती रुग्णवाहिकेतून रविवारी रात्रीच सिव्हिलला पोचवल्या गेल्या. काहीजण आपल्या दुचाकीवर सातारापर्यंत गेले. तिथे रात्रीत काहीच दखल न घेतल्याने रात्रीचे पुन्हा जीव धोक्‍यात घालून माघारी आले. सातारा सातारा सातारा सातारा 

Coronavirus : एकेक म्हणता म्हणता आता सहा झाले; त्या मृताचा रिपाेर्टही पॉझिटिव्हच 

लाकडे जमविण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत प्रशासनाला कसरत करावी लागली. अंत्यसंस्कार गाडीसाठीही बराच वेळ खोळंबा झाला. सविस्तर वाचा या लढ्याविषयी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Administration Taking Neccessary Steps In Nizre Village