esakal | सातारा जिल्हा रुग्णालयातील "बाजार' उघड 
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा जिल्हा रुग्णालयातील "बाजार' उघड 

डॉ. अमोद गडीकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रुग्णालयाचा कारभार सुधारेल, ही अपेक्षा त्यामुळे फोल ठरत आहे.

सातारा जिल्हा रुग्णालयातील "बाजार' उघड 

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यालाच ग्रहण लागल्याचे कालच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून समोर आले आहे. डॉ. अमोद गडीकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रुग्णालयाचा कारभार सुधारेल, ही अपेक्षा त्यामुळे फोल ठरत आहे. रुग्णालयाच्या कारभारात ठराविक जणांना जाणीवपूर्वक "टार्गेट' करण्याबरोबरच खाबूगिरीच्या जास्त चर्चा रंगू लागल्या होत्या. आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात चाललेला हा आरोग्याचा बाजार थांबणार कसा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

डॉ. सुरेश जगदाळे यांची बदली झाल्यानंतर डॉ. श्रीकांत भोई यांनी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्वीकारला. तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी कशातच उत्साह दाखविला नाही. त्यामुळे रुग्णालयाची शिस्त पूर्ण ढासळून गेलेली होती. कोणाचा कोणाला ताळमेळच राहिला नव्हता. अशा परिस्थतीत डॉ. अमोद गडीकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्वीकारला. कायद्यावर बोट ठेवून चालणारे आणि शिस्तीला मानणारे अशी सुरवातीला त्यांची छबी उभी राहिली. अनेक वर्षांच्या बेशिस्तीला ते शिस्त आणतील, अशी भोळी आशा त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर निर्माण झाली. सुरवातीला त्यांनी तशी भूमिकाही घेतली. त्याचे स्वागतच झाले. रुग्णालयाच्या कारभाराला काही प्रमाणात शिस्त लागली. त्यात आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, काही दिवसांनंतर शिस्तीचे रुपांतर शिष्टतेत व्हायला लागले. विविध कामे नको त्या गोष्टींवर बोट ठेवून अडकू लागली. अनेकांना जाणीवपूर्वक नोटिसा निघू लागल्या. देणारे मोकाट आणि न देणाऱ्यांवर टांगती तलवार अशा काहीशा परिस्थितीत रुग्णालयाच्या कारभार रूढ व्हायला लागल्याचे कर्मचारी बोलू लागले होते. तरही सुधारणा व्हायला लागली की काहींना त्रास होणार असे म्हणून त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. मात्र, दिवसेंदिवस जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभाराच्या, त्यांनी विशिष्ट कामासाठी नेमलेल्या माणसांच्या सुरस कथांचे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात चर्वण सुरू झाले होते. जिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या या बाजाराच्या चर्चा व कानाला लागणाऱ्या ठराविक लोकांचे ऐकण्याचे, त्यातून इतरांवर होणारा अन्याय याचे ग्रहण जिल्हा रुग्णालयाला लागले. त्यामुळे थोड्याच दिवसांत जिल्हा रुग्णालयात लाचलुचपत कारवाई होणारच, अशी परिस्थिती निर्माणच झाली होती. कालच्या कारवाईने रुग्णालयातील हा बाजार समोर आला. 
रुग्णालयातील सर्वच पातळ्यांवर सुरू झालेल्या अशा बाजारू प्रवृत्तीमुळे सहाजिकच जिल्हा शल्यचिकित्सकांचा सुरवातीचा वचक सैल होत गेला. त्यामुळे रुग्णालयातील व्यवस्था पुरती कोलमडत गेली. औषधांची उपलब्धता, डॉक्‍टरांची ओपीडीतील उपस्थिती, रुग्णालयाची स्वच्छता या सर्वच पातळ्यांवर अधोगती सुरू झाली. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा पगार, त्यांच्या अडचणींवर तातडीने न होणारे निर्णय त्याचा एकंदर रुग्णालयाच्या कारभारावर फरक पडला आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व रुग्ण कोणत्याच पातळीवर समाधानाचे व विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्यात जिल्हा शल्यचिकित्सक अपयशी ठरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा रुग्णालयाच्याच आरोग्यावर फरक पडला आहे. 


लाचेच्या प्रकरणाची "लिंक' नेमकी कोणापर्यंत? 

कालच्या लाचेच्या प्रकरणाची "लिंक' नेमकी कोणापर्यंत जाते, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु, रुग्णालयाच्या आरोग्याला अपाय करणाऱ्या या यंत्रणेची पाळेमुळे खोदून काढण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला करावे लागणार आहे. त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सकांनाही आपल्या एकंदर कार्यशैलीचा पुनर्विचार करावा लावणारी ही परिस्थिती आहे. तो झाला तरच रुग्णालयाचे आरोग्य सुधारू शकते, अन्यथा आणखी मोठे धक्के सोसावे लागतील. 

loading image
go to top