सातारा जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 August 2019

स्वातंत्र्यदिनी (ता. 15) सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजवंदनानंतर या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते होईल.

सातारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा आज (बुधवार) येथे करण्यात आली. धनुर्विद्या खेळाडू किशोर ऋषीकेश गुजर, मल्लाखांबपटू प्रतिक्षा माेरे तसेच वनिता शिताेळे (दिव्यांग, मैदानी खेऴ) यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार, धनुर्विद्याचे मार्गदर्शक प्रवीण सावंत यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, क्रिकेट खेळाचे संघटक संतोष (मयूर) कांबळे यांना गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
हे सन 2018 कालावधीचे पुरस्कार आहेत. स्वातंत्र्यदिनी (ता. 15) सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजवंदनानंतर या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते होईल.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीने यंदाच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली आहे. काेल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा क्री़डाधिकारी युवराज नाईक, शिवछत्रपती पुरस्कारार्थी सुजीत शेडगे, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी सिद्धार्थ लाटकर या समितीचे सदस्य आहेत. यंदाच्या पुरस्कारांसाठी आलेल्या अर्जांतून अंतिम पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये,  प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Sports Awards announced today