
पाचगणी (जि. सातारा) : माणसाने देव पाहिल्याचे कधी ऐकिवात नसले तरी माणसातील देवत्वाचे दर्शन सध्या येथील टेबल लॅंडवर होत आहे. लॉकडाउनमध्ये पर्यटक नसल्याने टेबल लॅंडवरील असंख्य माकडे भुकेने व्याकूळ झाली आहेत. या स्थितीत पाचगणीतील गोपाळ शर्मा हे दररोज सायंकाळी या माकडांना न चुकता फळे व भाज्या खायला देत आहेत. पर्यटक नसताना या माकडांना हा अन्नदाता मिळाला आहे.
आशिया खंडातील दोन नंबरचे पठार म्हणून ओळखला जाणारा टेबल लॅंडचा परिसर म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. येथे येणाऱ्या प्रत्येकाची पावले ही या प्रेक्षणीय स्थळाकडे वळतातच. येथील जनजीवन पूर्णतः निवासी शाळा व पर्यटकांवर अवलंबून. दरवर्षी एप्रिल, मेमध्ये पर्यटकांनी उन्हाळी हंगाम बहरलेला असतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या ग्रहणामुळे भयाचे सावट येथेही गडद झाल्याने सारे जनजीवन "लॉकआउट'च्या विळख्याने निद्रावस्थेत गेले आहे. अनेक गरजूंना उपजीविकेसाठी मदतीसाठी हात पुढे करण्याची वेळ आली आहे. या स्थितीत सामाजिक संस्था, दानशूर पुढे येऊ लागलेत. शहरात वावरणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठीही काहींनी झोकून घेतले आहे.
नेहमी टेबल लॅंडच्या कड्याकपारीत वास्तव्य करत असलेली असंख्य माकडे दिवस उजाडताच पठाराच्या काठावर येऊन बसतात. त्यांना पाहून पर्यटक तेथील व्यावसायिकांकडून शेंगा, चणे, कणीस, केळी, काकडी आदींसह इतर खाद्यपदार्थ घेऊन माकडांना देतात. या व्यावसायिकांचेही उदरनिर्वाहचे हेच एकमेव साधन. सध्या शहरात सर्वत्र सन्नाटा आहे. त्यात टेबल लॅंडही "नो मॅन्स लॅंड' झाल्याने व्यावसायिकांचे उदरनिर्वाहाचे साधन संपले आहे. शहरात गरजूंच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येऊ लागले असतानाच प्राण्यांकरिता झोकून देणारी मंडळीसुद्धा या गर्दीत दिसत आहेत. गोपाळ शर्मा हे त्यापैकीच एक. एका मिळकतीत केअरटेकर म्हणून ते काम करतात. टेबल लॅंडवरील मुक्या प्राण्यांसाठी दररोज सायंकाळी बादली भरून फळे, भाज्या घेऊन जाण्याची त्यांची दिनचर्या लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून सुरू केली आहे. ते आल्याचे पाहताच सर्व माकडे हुरळून जातात. मिळेल त्या फळावर ताव मारण्यासाठी धावत येतात. मनसोक्तपणे खाऊन झाल्यानंतर डोंगररांगात दिसेनासी होतात. सध्याच्या कठीण परिस्थितीत गोपाळ शर्मांच्या रूपाने टेबल लॅंड परिसरातील माकडांना अन्नदाताच मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.