सातारा जिल्ह्यात महिन्याला किती रुपयांची दारु विकली जाते जाणून घ्या

सातारा जिल्ह्यात महिन्याला किती रुपयांची दारु विकली जाते जाणून घ्या

सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. सर्वाधिक महसूल मिळवून देणारी दारूविक्री बंद राहिल्याने जिल्ह्यातून दारूविक्रीतून शासनाला मिळणारा तब्बल 102 कोटींचा महसूल बुडाला आहे. महिन्याकाठी जिल्ह्यातून 51.66 कोटींची दारूची विक्री होते. सर्वाधिक विक्री देशी दारूची होत असून, त्यापाठोपाठ विदेशी आणि बिअरची विक्री होते. आता दोन महिन्यांनंतर दारूची दुकाने पुन्हा सुरू झाल्याने टोकन पध्दतसोबतच राज्य शासनाच्या निर्णयानुसार घरपोच दारू देण्याचा विचार जिल्ह्यात सुरू आहे. 

परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढला. सातारा जिल्ह्यात परदेशातून आलेल्यांसोबतच पुण्या-मुंबईतून आलेल्यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 124 रुग्ण असून, सर्वाधिक रुग्ण कऱ्हाडला आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर देशासह जिल्ह्यातही लॉकडाउन करण्यात आले. बंदमध्ये दारूविक्रीची सर्व दुकाने बंद राहिल्याने 20 मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या 12 तारखेपर्यंत दारूविक्री बंद होती. त्यामुळे दोन महिने दारूची विक्रीच बंद असल्याने यातून शासनाला मिळणारा महसूल बुडाला आहे. 

सातारा जिल्ह्यातून शासनाला दारूविक्रीतून 620 कोटींचा महसूल कर स्वरूपात जमा होतो. यामध्ये देशी, विदेशी आणि बिअर बार या दुकानांतून मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. महिन्याला आठ लाख 88 हजार 804 बल्क लिटर इतकी देशी दारूची विक्री होते. तर विदेशी मद्याची चार लाख 81 हजार 583 बल्क लिटर तसेच बिअरची दोन लाख 89 हजार 416 बल्क लिटर इतकी विक्री होते. साधारण मार्च, एप्रिल व मे महिन्यात विदेशी आणि बिअरची विक्री वाढते. वर्षभरात साधारण 620 कोटींचा महसूल शासनाला एकट्या सातारा जिल्ह्यातून मिळतो. 
गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे दारूची विक्री बंद राहिल्याने साधारण महिन्याला 51.66 ते 53 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. राज्य शासनाने हा बुडणारा महसूल सुरू करण्यासाठी राज्यभरात दारूविक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आजपर्यंत दारूविक्रीची दुकाने सुरू केली नाहीत. आजपासून जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित ठिकाणची सर्व दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत दारूची दुकाने सुरू झाली आहेत. आता राज्य शासनाने घरपोच दारू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच सातारा जिल्ह्यातही घरपोच दारू देण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले. 

दारूविक्री आणि महसूल... 

  • दारूविक्रीतून जिल्ह्यातून जाणारा महसूल : 620 कोटी 
  • देशी दारूची महिन्याला विक्री : आठ लाख 88 हजार 804 
  • विदेशी दारूची महिन्याला विक्री : चार लाख 81 हजार 583 
  • बिअरची महिन्याला विक्री : तीन लाख 39 हजार 801 
  • महिन्याला मिळणारा महसूल 51.66 कोटी
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com