पाणी आहे... बोटींगही करायचेय पण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

गेल्यावर्षी दुष्काळामुळे व्यवसाय बुडाला... यंदा कोरोनाने गप्प बसवले... ही अवस्था आहे, तापोळा, बामणोलीतील बोटींग व्यावसायिकांची. काेयना धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही ऐन उन्हाळी हंगामात लॉकडाउनमुळे बोटींग व्यवसाय बंद असल्याने व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 

कास (जि. सातारा) ः महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाला नुकतीच 58 वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत व औद्योगिक प्रगतीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या, पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न मिटवून समृद्धी आणणाऱ्या या धरणात यंदा मे महिनाअखेर आली तरी समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, लॉकडाउनमुळे बोटींग व्यवसाय ठप्पच आहे. 

गतसाली याच दिवसात कोयनेने तळ गाठला होता. बामणोली, तापोळा परिसरात नदीचे पात्र पूर्ण कोरडे पडल्याने भेगाळलेले पात्र भयाण दिसत होते. जलाशयात बुडालेले जुन्या गावांचे अवशेष, नदीवरील जुने दगडी पूल, मंदिराचे अवशेष अनेक वर्षांनी दिसले होते. त्यामुळे या भागातील कोयना धरणाच्या अगोदरच्या आठवणींना उजाळा मिळाला होता. पण, या वर्षी पात्रात भरपूर पाणी असल्याने व पावसाळा जवळ आल्याने हे अवशेष यावर्षी तरी दिसणे शक्‍य नाही. 

कोरोना इफेक्‍टमुळे लॉकडाउन झाल्याने बाजारपेठेतील उलाढाल थंडावली आहे. कोयना धरणावर अवलंबून असलेले व्यवसायही त्याला अपवाद नाहीत. या धरणातील जलाशयावर चालणारा बोटिंग व्यवसाय पूर्ण ठप्प आहे. गतसाली पर्यटन व पर्यटक दोन्ही होते, तर पाणीपातळीने दगा दिला होता. यावर्षी भरपूर पाणी असूनही कोरोनाच्या दणक्‍याने बामणोली, तापोळा भागातील पर्यटन व्यवसाय कोलमडून गेला आहे. पाणी आहे पण बोटी बंद, अशी अवस्था झाली आहे. या भागातील दळणवळणही पाण्यावरच अवलंबून असून यावर्षी पाणी असल्याने उन्हाळ्यात कोरड्या पात्रातून होणारी अनेक किलामीटरची पायपीट वाचली आहे. 

कोयनेच्या गोड्या पाण्यातील चवदार असणारे शिंगाडा, परग, खवल्या, रावस, कोळशी इत्यादी अनेक जातीचे मोठे मासे मिळायला सुरवात झाली असून स्थानिक लोक मच्छीमारी करून लॉकडाउनच्या काळात चार पैसे कमावत आहेत. 

अतिरिक्त पाण्याचे नियोजन आवश्‍यक 
कोयना धरणात 20 मे रोजी 39.30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून 2092.10 फूट इतकी पाणीपातळी आहे. याच दिवशी गतसाली 23.93 टीएमसी पाणीसाठा होता, तर पाणीपातळी 2064 फूट होती. यावर्षी धरणात 15.37 टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. गतसाली पाणी सोडण्याचे नियोजन फसल्याने कोल्हापूर, सांगलीला पुराचा मोठा फटका बसला होता. यावर्षी अतिरिक्त पाणी असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे.

 

सातारा : दाेन महिन्यांच्या बाळासाह चाैघांचा मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara I want to go boating but...