कासचा फुलांचा हंगाम टिपेला! 

कासचा फुलांचा हंगाम टिपेला! 

सातारा - गडद पिवळ्या रंगाची आणि त्यावर दोन लाल ठिपके असलेली स्मितीया (कावळा) व गुलाबी तेरडा या दोन रंगांच्या फुलांनी सध्या कास पठार आच्छादले आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि त्यावर वैशिष्ट्यपूर्ण काटे असल्याचे भासणारी नाजूक कुमुदिनीच्या (पानभोपळी) फुलांनी कास पठारावरील कुमुदिनीचे तळे देश-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. "कास'च्या फुलांचा बहर सध्या टिपेला असून अजून तो 15 दिवस टिकेल, असा येथील तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

"युनेस्को'ने जागतिक निसर्ग वारसस्थळाचा दर्जा दिल्याने देश-विदेशी पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळली. नेमकं काय आहे, या पठारावर हे पाहण्यासाठी पुणे, मुंबई, ठाण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटक कासला भेट देऊ लागले आहेत. यावर्षी कास भागात पर्जन्यमानाबरोबरच पावसाची चांगली उघडीपही मिळाल्याने पठारावरील रानफुलांना बहर आला. महिन्याभरापूर्वी येथील फुलांचा मोसम सुरू झाला. 

पठारावरील बहुतांश रानफुलांचे आयुष्यमान 10 ते 15 दिवसांचे असल्याने पठार वरच्यावर रंग बदलत असते. गडद पिवळ्या रंगाची व त्यावर लाल दोन ठिपके असलेली "स्मितीया' तसेच गुलाबी रंगाच्या तेरड्याच्या फुलांनी जणू पठारावर गालिचा अंथरल्याचा आभास होतो. हे नयनमनोहर दृष्य पर्यटकांचे आकर्षण ठरले असल्याची माहिती कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. याशिवाय गवळण, सितेची आसवे, विघ्ऩा, ड्रॉसेरा, धनगरी गेंद, सायनोटीस, सोनकी आदी रानफुलेही पाहायला मिळतात, असेही त्यांनी सांगितले. 

पठारावर, राजमार्गाला सुमारे दीड किलोमीटर अंतरावर कुमुदिनी तळे आहे. जांभ्या दगडात साठलेल्या पाण्यात तयार झालेल्या तळ्यामधील कुमुदिनीची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. स्थानिक भाषेत या फुलांना पानभोपळीची फुले म्हणतात. राज्य फूल "ताम्हण' या कुळातील ही पानवनस्पती आहे. जंगली शोभिवंत वनस्पती म्हणून ही वनस्पती लोकांच्या बागेत आणण्यासाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. "सायंकाळी चारनंतर कुमुदिनीची फुले मावळायला सुरवात होते. सकाळी सात ते दुपारी एक ही फुले पाहण्याची योग्य वेळ आहे,' अशी माहिती वनपाल श्रीरंग शिंदे यांनी दिली. रानफुलांचा बहर सध्या टिपेला असून तो 15 ऑक्‍टोबरपर्यंत असाच राहील, असा अंदाज वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी व्यक्त केला. 

गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करा 
कास पठाराची विशिष्ट धारण क्षमता आहे. त्यापेक्षा अधिक पर्यटकांचा राबता पठारावर राहिल्यास अंतिसंवेदनशील असलेल्या दुर्मिळ वनस्पतींना धोका संभवतो. त्यामुळे पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग प्रणालीचा वापर करून कास पठारावरील प्रवेश आगाऊ निश्‍चित करावा. Kas.ind.in या वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बुकिंग करावे, असे  आवाहन जावळीचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com