सातारा लोकसभेचा सामना विकास अन्‌ प्रतिमेवर !

 सातारा लोकसभेचा सामना विकास अन्‌ प्रतिमेवर !

सातारा : लोकसभा पोटनिवडणुकीतील सामना आता पक्का झाला आहे. मतदार तेच असले तरी, उमेदवारांसाठी मते मागणारे बदलणार आहेत. अनेकांना पाच महिन्यांपूर्वी घेतलेल्या भूमिकेच्या उलट भूमिका घ्यावी लागणार आहे. विकास व प्रतिमा या दोन महत्त्वाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली जाईल, असे संकेत सुरवातीच्या प्रचारातून येऊ लागले आहेत. त्याला जिल्ह्यातील मतदार कसा प्रतिसाद देतात, यावर निकालाचे गणित अवलंबून असणार आहे. 

भाजपकडून उदयनराजे भोसले तर, राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अवघ्या पाच महिन्यांत सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना पुन्हा एकदा आपला प्रतिनिधी निवडायच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. अशा वेळी गेल्या वर्षभरातील घटनाक्रम मतदारांच्या नजरेसमोरून जात आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांचा विरोध असूनही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी दिली. मोदी लाट असूनही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदार व कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत उदयनराजेंनी वेगळी वाट पकडण्याचा निर्णय घेतला. खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपवासी झाले.

त्यामुळे लोकसभेची पोटनिवडणूक लागली आहे. उदयनराजे भाजपकडून उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादीने सुरवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारीसाठी विचारणा केली. त्यांची तयारी नसल्यामुळे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. सामना आता "फिक्‍स' झाला आहे. परंतु, काही महत्त्वाच्या मुद्यांना दोन्ही नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार आहे. 

दोन्ही बाजूच्या नेत्यांना आता मागील निवडणुकीतील आपली भूमिका बदलावी लागणार आहे. विशेषत: शिवसेनेच्या उमेदवाराची लढाई हातात घेतलेल्या भाजपच्या नेत्यांनी उदयनराजेंवर सडकून टीका केली होती. त्यांच्या कोणत्या गुणावर त्यांनी बोट ठेवले नाही असे नाही. जिल्ह्यातील उद्योगधंद्यांची वाताहत कुणामुळे झाली, खंडणीची दहशत कोणाची आहे, कोणाला काय लागते, कोणी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्यात, असे काही काही ठेवले नाही. आता तेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या उमेदवाराबाबत काय सांगतात, याची मतदारांना उत्सुकता आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या, आमच्याकडे पेढेवाले मोदी आहेत, असे म्हणणाऱ्या उदयनराजेंना आता त्यांचेच गुणगान करावे लागणार आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांना उदयनराजेंची उमेदवारी त्यावेळीही नको होती. केवळ पक्षादेश म्हणून त्यांनी उदयनराजेंचा प्रचार केला होता. आता राष्ट्रवादीच्या तळागाळातील मतदारालाही आवडत्या असणाऱ्या नेतृत्वापैकी एक असलेल्या श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उदयनराजेंनी असे करायला नको होते, अशी भावना त्यांना मतदान केलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे. शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात निर्माण झालेल्या चैतन्याची जोडही कार्यकर्ते व मतदारांना आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते व मतदारांची होणारी वैचारिक व भावनिक कोंडी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व मतदारांना होईलच असे नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. 

या वेळची निवडणूकही विकास, प्रतिमा व भावनिकता या मुद्यांवर लढली जाईल. दोन्ही बाजूच्या सध्याच्या प्रचाराच्या रोखावरून ते स्पष्ट होत आहे. "अडवा आणि जिरवा' असे धोरण आणि त्यातून विकास करता आला नाही, ही राष्ट्रवादी सोडण्याची कारणे उदयनराजेंकडून सांगितली जात आहेत. त्यांच्या प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दाही तोच दिसतो आहे. या मुद्यातून विकासाला प्राधान्य देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असे दिसते आहे. राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांच्या रूपाने एक चांगल्या प्रतिमेचा, कुशल प्रशासक, स्वाभिमानी विचाराचा आणि मुख्य म्हणजे बहुजन विचार मांडणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा, राष्ट्रवादीशी निष्ठा बाळगणारा उमेदवार दिला असल्याचे जनमाणसावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रतिमेचेही लढाई होणार आहे. 

राजकारणातील जमिनीवरील ताकदीचा विचार करायचा झाल्यास लोकसभा निवडणुकीतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कोरेगाव, कऱ्हाड उत्तर व वाई हे तीन राष्ट्रवादी व कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचा या चार मतदारसंघांत आघाडीचे वर्चस्व आहे. तर, पाटण तसेच शिवेंद्रसिंहराजे व त्यांचा स्वत:चा सातारा असे दोनच मतदारसंघ सध्या तरी उदयनराजेंच्या पारड्यात पकडता येतात. त्यातही श्रीनिवास पाटील हे मूळचे पाटणचे आहेत. सध्याच्या लोकसभा मतदारसंघातील कऱ्हाड, पाटण, जावळी व सातारा तालुक्‍यांतील काही गावांचे त्यांनी यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे.

त्यांच्या कार्यशैलीची या गावांतील माणसांना माहिती आहे. प्रत्येक गावात त्यांचा संपर्कही आहे. त्यामुळे यावेळी उदयनराजेंना तेथून कशी साथ मिळणार, हेही पाहावे लागणार आहे. मागील निवडणुकीत पडलेल्या मतांवर आडाखे बांधायचे म्हटले तरी, उदयनराजेंना पडलेल्या पाच लाख 79 हजार मतांमध्ये त्यांची हक्काची किती आणि नरेंद्र पाटील यांना पडलेल्या चार लाख 52 हजार मतांमध्ये उदयनराजेंना विरोध म्हणून पडलेली आघाडीची मते किती, यावर निवडणुकीचा खेळ अवलंबून असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com