डोंगरी मेवाही विलगीकरणात...

सुनील कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनाच्या संकटामुळे यंदा ऐन उन्हाळ्यातील पर्यटन हंगाम वाया गेला. त्यामुळे पाचगणी, महाबळेश्‍वरातील व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आता लॉकडाउनमुळे रास्पबेरी, मलबेरी, गुजबेरी, तोरण, आंबोलकीसारखा डोंगरी मेवाही बाजारपेठेत येऊ शकला नाही. डेंगरी मेवा विक्रीतून उत्पन्न घेण्याऱ्यांपुढेही आता आर्थिक संकट निर्माण झाले आहे. 

पाचगणी (जि. सातारा) : कोरोनाचे सावट अधिक गडद झाल्याने या भागातील रास्पबेरी, मलबेरी, गुजबेरी, तोरण, आंबोलकी हा "डोंगरी मेवा' लॉकडाउनच्या विळख्यात अडकला असून, विलगीकरणात असलेल्या या फळांची गोडी चाखणे ग्राहकांनाही दुरापस्त झाले आहे. 

दरवर्षी एप्रिल- मेमध्ये उन्हाळी हंगाम सुरू होतो. देश, परदेशातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात. डिसेंबरपासून पर्यटक पाहुण्यांच्या दिमतीला स्ट्रॉबेरी दाखल झालेली असते. काही दिवसांत रास्पबेरी, मलबेरी बाजारपेठेत पाऊल टाकते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून गुजबेरी, तोरणे, आंबोलकी, करवंद आदी डोंगराच्या काळ्या मैनेचे आगमन होते. या वर्षी मार्चच्या मध्यावधीपासून कोरोनाने आपले जाळे टाकले अन्‌ मागणीअभावी स्ट्रॉबेरीचे दर कोलमडले. घाऊक बाजारपेठेत मागणी खुंटली. पर्यटकांना नो एन्ट्री असल्याने बाजारपेठेतील एकूणच आर्थिक घडी विस्कटली. लॉकडाउनचे सत्र सुरू झाले अन्‌ रानावनातून दर वर्षी बाजारपेठेत दाखल होणाऱ्या रास्पबेरी, गुजबेरी, मलबेरी, तोरणे, आंबोलकी, करवंदे हा डोंगरी मेवा तोडून आणण्याच्या वाटाही स्तब्ध झाल्या. त्यानंतर अवकाळी पावसाने डोळे वाटारले आणि या नैसर्गिक फळांचा ठेवा होता तो पूर्णपणे नष्ट झाल्याचे पांगारी येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र पांगारे यांनी सांगितले. 

वर्षाऋतू काही दिवसांवर येऊन ठेपला असला, तरी कोरोना आणि निसर्गाच्या लहरीपणाने रायवळ आंब्याच्या व आंबा विक्रेत्यांना जखडून ठेवल्याने त्यातच आर्थिक चणचणीने डोके वर काढल्याने सर्वसामान्यांना आता महागडे आंबे खरेदी करावयास लागत आहेत. दरम्यान, तालुक्‍याच्या खिंगर, आंबरळ, राजपुरी व शहरातील काही भागांत फणसांची झाडे फळांनी बहरली आहेत, मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे ती झाडावर तशीच आहेत, तर घाऊक बाजारपेठेत जाणाऱ्या कच्च्या फणसांची मागणीसुद्धा खुंटली असल्याचा शेतकऱ्यांचा सूर आहे. 

 

अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने डाेंगरात असलेल्या रानमेव्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- महेंद्र पांगारे, प्रगतशील शेतकरी, पांगारी

 

 

 

लाेणंद पाेलिसांनी दणक्यात साजरा केला तिचा वाढदिवस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mountain fruit lockdown