साताराः वणवे कमी झाल्याने ऐन उन्हाळ्यात डोंगर हिरवेगार

यशवंतदत्त बेंद्रे
शनिवार, 23 मे 2020

विभागातील करमाळे, वेखंडवाडी, घोट व जळव येथील डोंगर वनविभागाच्या हद्दी आहेत. शेजारील खासगी क्षेत्रात वणवे रोखल्यामुळे ते वनविभागाच्या हद्दीत पोचले नाहीत. यामुळे येथील वृक्षराजी बहरली आहे. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात इतरत्र भकास दिसणारे डोंगर येथे यंदा मात्र हिरवेगार दिसून येत आहेत. हे आल्हाददायक चित्र दिसून येत आहे. 

तारळे (जि. सातारा) ः विभागातील डोंगररांगांत प्रामुख्याने "अंधश्रद्धे'पोटी वर्षानुवर्षे लावले जाणारे वणवे (आगी) वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे कमी झाल्याने यंदा ऐन उन्हाळ्यात विभागातील डोंगरांनी हिरवी चादर पांघरल्याचे आल्हाददायक चित्र पाहायला मिळत आहे. 

उन्हाळा म्हटले, की रखरखते ऊन, घामाच्या धारा, उघडे बोडके डोंगर, वणव्याच्या आगीने होरपळलेली झाडे-वेली, काळवंडलेल्या डोंगररांगा, असे नेहमी दिसणारे दृश्‍य या वेळी तारळे विभागामध्ये बदलले आहे. वनविभागाच्या ढोरोशी व तारळे परिमंडलातील वनरक्षक आणि वनमजूर दर वर्षी वणवे लावले जाऊ नयेत, यासाठी जनजागृती करतात. त्यामध्ये "अंधश्रद्धे'पोटी वर्षानुवर्षे लावले जाणारे वणवे रोखण्याच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. या वेळी काही प्रमाणात वणवे रोखले गेले आहेत. यंदा वणवा लावणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केल्याने वणवे घटले आहेत. 
तारळे विभागात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन व जनजागृती करून वणवे रोखण्याबरोबरच वनहद्दीतील झाडांचे संगोपन केले. 
गेल्या काही वर्षांत वृक्ष लागवडीने जोर धरला. कोटी कोटीत वृक्ष लागवड झाली. वनविभागाने यासाठी कंबर कसली होती. विभागातील करमाळे, वेखंडवाडी, घोट व जळव येथील डोंगर वनविभागाच्या हद्दी आहेत. शेजारील खासगी क्षेत्रात वणवे रोखल्यामुळे ते वनविभागाच्या हद्दीत पोचले नाहीत. यामुळे येथील वृक्षराजी बहरली आहे. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात इतरत्र भकास दिसणारे डोंगर येथे यंदा मात्र हिरवेगार दिसून येत आहेत. हे आल्हाददायक चित्र दिसून येत आहे. 
वणवे रोखण्यासाठी प्रामुख्याने वनरक्षक रवींद्र कदम यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना उपवनसंरक्षक भूपेंद्र हाडा, किरण कांबळे, वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल हणमंत कुंभार यांचे मार्गदर्शन मिळाले. वनरक्षक अरविंद जाधव, वनसेवक संजय जाधव, संपत टोळे, विजय मगर, भरत निकम, अमोल काटे, हणमंत मोहिते आदींचे सहकार्य मिळाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mountain Green As Fire Subsides