खतप्रकल्पाअभावी हुकले पालिकेचे मानांकन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

गेल्या वर्षी मंजुरी मिळालेल्या पालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पाला वर्ष पूर्ण होऊनही मुहूर्त लागलेला नाही. वर्षभर शासनाच्या विविध परवानगी व मान्यता मिळविण्यात गेले आहेत. आता पावसाळ्याच्या तोंडावर हा प्रकल्प सुरू करणे अशक्‍य आहे. त्यामुळे पालिकेने पावसाळा सोडून सहा महिन्यांची मुदतवाढ या प्रकल्पाच्या ठेकेदार कंपनीला दिली आहे. त्यामुळे आगामी सहा-सात महिन्यानंतर तरी मशिनरी बसून हा प्रकल्प सुरू होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

सातारा : सातारा पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोतील कचरा जाळला जात असल्याने होणारे हवेचे प्रदूषण आणि परिसरातील जलस्त्रोत दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे सर्व टाळून पर्यावरण रक्षणासाठी या कचऱ्यापासून खतनिर्मिती करून उर्वरित कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सातारा पालिकेने बायोमायनिंग प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला.

स्वच्छ भारत अभियानात पालिकांना कचरा विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पासाठी मार्क होते. त्यानुसार सातारा पालिकेने सोनगाव कचरा डेपोत बायोमायनिंग प्रकल्प उभारण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला. सहा कोटींच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि साशा कंपनीला प्रकल्प उभारण्याचे टेंडर मिळाले.

गेले वर्षभर विविध परवानगी, शासकीय मान्यता घेण्यात वेळ गेला. या प्रकल्पात मशिनरी उभारून कचऱ्याची विल्हेवाट लावणे, हा उद्देश होता. यातून खतनिर्मिती व उर्वरित कचऱ्याचे विघटन करणे, असा हा प्रकल्प होता. यातून सोनगाव कचराडेपो परिसरातील होणारे हवेचे प्रदूषण तसेच जलस्त्रोत दूषित करण्याचे प्रमाण कमी करणे, हा मुख्य उद्देश होता. टेंडर प्रक्रिया करून वर्ष झाले तरी शासनाच्या विविध मान्यता मिळण्यात मार्च 2020 उजाडले. तोपर्यंत कोरोनाची साथ सुरू झाल्याने सर्वत्र लॉकडाउनमुळे बंद करण्यात आले.

परिणामी या प्रकल्पाच्या मशिनरी आणून त्या बसविण्याचे कामही थांबले. आता कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली असली तरी आगामी महिन्याभरात पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात हे काम होणार नाही. परिणामी पालिकेने या प्रकल्प उभारण्यास पावसाळा सोडून सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये या प्रकल्पातील मशिनरी सोनगाव कचरा डेपोत बसणार आहेत. त्यामुळे केवळ कागदोपत्री असलेल्या या बायोमायनिंग प्रकल्पाला मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

मानांकन हुकले... 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत सर्व पालिकांचे सर्वेक्षण होते. लोकसंख्येच्या आधारे कचरामुक्त शहरांची स्पर्धा घेतली जाते. यामध्ये फाइव्ह, थ्री व वन स्टार मानांकन पालिकांना दिले जाते. यावर्षी हा बायोमायनिंग प्रकल्प सुरू नसल्याने आणि सोनगाव कचरा डेपोतील तांत्रिक त्रुटीमुळे व अस्वच्छतेमुळे सातारा पालिका या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. 

पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही सूचना पाेचवा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Municipal Corporation Extends Construction Of Fertilizer Project