esakal | त्यांनी पळून गेलेल्या आमदारांना आणलं होतं पकडून... आज झालं चीज
sakal

बोलून बातमी शोधा

त्यांनी पळून गेलेल्या आमदारांना आणलं होतं पकडून... आज झालं चीज

दस्तुरखुद्द शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, श्रीनिवास पाटील यांच्याकडे शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीची आग्रही मागणी कोरेगाव मतदारसंघातील व सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली हाेती. त्यावर शिक्कामाेर्तब झाला.

त्यांनी पळून गेलेल्या आमदारांना आणलं होतं पकडून... आज झालं चीज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी कामगार नेते व माजी मंत्री शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी (ता. ११) राष्ट्रवादीचे हे दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

माजी मंत्री शशिकांत शिंदे हे गेली २० वर्षे विधानसभेत धडाडत राहिलेली 'राष्ट्रवादी'ची ही तोफ आता विधानपरिषदेत धडाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे कोरेगाव, जावळीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते व राज्यभरातील कामगार वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी येत्या ११ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे नाव सुरवातीपासूनच आघाडीवर राहिले. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे पुन्हा विधीमंडळात जातीलच, याबाबतचा आत्मविश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करू लागल्याने ही संधी शिंदे यांना मिळणार का, याकडे आणि त्या अनुषंगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.

 
श्री. शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्कामोर्तब केले असून, सोमवारी दोघेही आपले अर्ज दाखल करतील, अशी माहिती श्री. शिंदे यांनी सकाळ'शी बोलताना दिली. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष अडचणीत असतानाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात झंझावात निर्माण केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा येथे भर पावसात झालेल्या सभेचे नेटके पूर्वनियोजन त्यांनी केले.

या सभेचा संपूर्ण राज्यभर परिणाम झाला. मात्र, निवडणुकीच्या धावपळीत शिंदे यांना स्वत:च्या कोरेगाव मतदारसंघात निर्णायक क्षणी लक्ष घालण्यास अपुरा वेळ मिळाला. परिणामी त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतरच्या
काळात शशिकांत शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होऊ लागली. दरम्यान, सत्ता स्थापनेच्या घडामोडी आणि गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली.

राष्ट्रवादी हा सत्ताधारी महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे विधानपरिषदेमध्ये विरोधकांचे हल्ले परतवून लावणाऱ्या व सरकारची बाजू भक्कमपणे उचलून धरणाऱ्या आक्रमक प्रतिनिधींची राष्ट्रवादीला नितांत आवश्यकता आहे. त्यात शिंदे यांचे नाव अगदी 'फिट्ट' बसते. यापूर्वी धनंजय मुंडे विधानपरिषदेत राष्ट्रवादीच्या बाजूने गरजत होते, आता ते विधानसभेत गेले आहेत. त्यांची पोकळी भरून काढण्यासाठीराष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांना निश्चितपणे संधी मिळेल, असा आत्मविश्वास कार्यकर्ते व्यक्त करू लागले.

त्यासाठीच दस्तुरखुद्द शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, श्रीनिवास पाटील यांच्याकडे शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीची आग्रही मागणी कोरेगाव मतदारसंघातील व सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्या नावावर पक्षाने
शिक्कामोर्तब केल्याने आता शिंदे यांची तोफ विधानपरिषदेत धडाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.