प्रत्येक गावाला रोल मॉडेल बनण्याची संधी - पोपटराव पवार

प्रत्येक गावाला रोल मॉडेल बनण्याची संधी - पोपटराव पवार

प्रत्येक गावात चांगुलपणा आहे. गावकऱ्यांनी इतर दहा गावे पाहिली, की त्यांना दिशा मिळते. राळेगणसिद्धी, हिवरेबाजारप्रमाणे इतर गावांनीही ‘रोल मॉडेल’ बनावे. ग्रामविकासात दहा वर्षांनी पिढी बदलते. उच्चशिक्षित राजकारणात येत असून, त्याचे फायदे ग्रामविकासाला होत आहेत. प्रत्येकाने आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडल्यास लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, अधिकाऱ्यांनी समन्वयातून काम केले तरच गावचे चित्र बदलेल, असे मत आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी ‘कॉफी वुईथ सकाळ’ उपक्रमात व्यक्‍त केले.

ग्रामविकासाचे जनरेशन दर दहा वर्षांनी बदलते म्हणून आम्ही दर दहा वर्षांनी एका उपक्रमात सहभाग घेतो. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, धामणेर याशिवायही अनेक गावे रोल मॉडेल झाली पाहिजेत. आम्हालाही तेच दिले आहे जे सर्वांना दिले आहे, असे नमूद करुन श्री. पवार म्हणाले,‘‘ग्रामविकास विभागाचे पाच लाख कोटीचे बजेट आहे. एका गावाला ५० लाखांपर्यंत निधी मिळेल, मग गाव का बदलत नाही? शासनाने एक लाख दिले, तर आम्ही सव्वा लाख रुपयांचे श्रमदान करतो. केंद्र आणि राज्याच्या ग्रामविकासच्या १४ योजना आहेत. त्या राबविल्या तर गाव नक्‍की बदलेल. सरकारी पैशातून काम करणे आणि लोकांना बरोबर घेऊन काम टिकविणे सर्वात अवघड बाब आहे. आम्ही पहिल्यांदा ग्राम अभियानमध्ये सहभाग घेतला. त्या वेळी जिल्ह्यातही आम्हाला बक्षीस मिळाले नाही. लोक नाराज झाले; पण करायचे हे आम्ही ठरविले. पुन्हा संयुक्‍त वनव्यवस्थापनमध्ये आम्ही उतरलो. तेथे चांगले काम केले आणि चित्र बदलले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात आम्ही कमी पडल्याने गावातील लोक पेटून उठले. जे पेटले त्यांनी सहा महिन्यांत अख्ख्या गावात शौचालये बांधली आणि सहा महिन्यांत आम्ही राज्यात प्रथम आलो. अपयश आल्याने त्यातून शिकलो आणि उच्च पातळीवर गेलो; परंतु जमिनीवरील पाय हलू दिले नाहीत.’’

झारखंडमधील रांचीजवळील दारूही संस्कृती असलेल्या १६ हजार लोकसंख्येच्या आदिवासी गावाने व्यसनमुक्‍ती केली. असे बदल होत आहे. तेथे दर आठवड्याला श्रमदान होते. 

तेथील आयुक्‍त चार- आठ दिवसांतून एकदा त्या गावात मुक्‍कामी जातात. राजस्थानमधील शामसुंदर पालिवाल हा हिवरेबाजारमध्ये आला आणि त्याने त्याच्या गावात काम सुरू केले. आज त्याला ‘राजस्थानचा पोपटराव पवार’ म्हणून ओळखले जाते. मध्य प्रदेशमध्ये कमीतकमी ५० गावे पुढे आली. असे राज्यातील इतर गावांनीही पुढे आले पाहिजे, तरच ग्रामविकासाची चळवळ उभी राहील. भोपाळमधील एक गावात परदेशात शिकलेली मुलगी सरपंच झाली असून, तेथे खूप चांगली काम करत आहे, असे सांगून त्यांनी परराज्यातील स्थिती स्पष्ट केली. 

खोल किती जायचे हे ठरवा
राज्यात ५२ टक्‍के भाग अवर्षणग्रस्त आहे. आपण पाणी अडविणे, जिरविण्याचे काम जोरात करत आहे. त्यात कमी नाही. पाणी जिरविले की आपण लगेच बारमाही पिकाकडे जातो. बारमाही पिकांकडे गेलो की समस्या सुरू होतात. राज्याला मर्यादा आहेत. ५२ टक्‍के अवर्षण भाग असल्याने पाच वर्षांत सर्व कामे पाण्याने भरत नाहीत. वाळू, मुरुम, कठीण मुरुम हे भूस्तराचे फिल्टर आहेत; परंतु पाणी अडविण्यासाठी आपण ओढे जास्त उकरून हे फिल्टर खराब करत आहोत. गावे पाणीदार झाली तरी या फिल्टरमधून पाणी जिरले पाहिजे. खडकाची तोंडे उघडे करून आपण शिवारातील गाळ ओढ्यात आणत आहोत. तो गाळ खडकात बसल्यास पाणी जिरण्याचे छिद्रे बंद होत आहेत. त्यामुळे खडक, भूस्तराची तोंडे उघडी पडू नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. राज्यात ८१ टक्‍के बेसॉल्ट खडक आहेत. त्यात पुनर्भरण क्षमता कमी असते. ओढ्यांवरच पाणी अडविणे, उकरण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ही समस्या उद्‌भवू नये, यासाठी खोल किती जायचे हे ठरविले पाहिजे.

पाण्याचा ताळेबंद महत्त्वाचा
पाण्याचा ताळेबंद, कामांचा समन्वय, श्रमदानातून काम हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. आम्ही यशस्वी झालो, त्याला ही कारणे आहेत. पाण्याचा ताळेबंद केला, कोणती पिके घ्यायची ठरविली. गावात पीक घेताना ठरवून घेत असतो. आम्ही गावची सर्व जमीन मोजली. त्यावर सलग समतल चर केल्या आणि वृक्षारोपण केले. त्यामुळे पुढील १०० वर्षांतील कटकट मिटली आहे. भविष्यात सर्वात मोठी समस्या ही बांधांची असणार आहे. कोणी शेतात येऊन काम करून देणार नाही. आमचे गाव सर्वात आनंदी गाव आहे. 

पिकांना हमीभाव द्या
कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून द्या. त्यांचे जमिनीचे दावे सोडवा. ठराविक पिकांना हमीभाव द्या. शेतकरी आत्महत्या नाही करायचा. महाराष्ट्रातील पाच वर्षांत दोन वर्षे दुष्काळ असतोच. त्यामुळे पुन्हा ही समस्या उद्‌भवणार आहे. जर दुष्काळ कायमचा असेल आणि बाजारपेठ अशीच असेल तर काहीही करा शेतकऱ्यांच्या जीवनात काही बदल होणार नाही. 

जनतेतून सरपंच निवड योग्यच
सरपंचांचे दोन प्रकार असून, एक प्रतिष्ठेसाठी तर एक समाज परिवर्तनासाठी आहे. प्रतिष्ठेसाठी एक-एक वर्ष सरपंचपद वाटून घ्यायला लागले. त्यामुळे गावात अस्थिरता यायला लागली. या निर्णयामुळे अस्थिरता कमी होणार आहे. अविश्‍वास, अस्थिरता यामुळे केवळ विकासकामाबाबत तोडजोडी होत होत्या. झोकून देऊन विकास होत नव्हता. जनतेतून सरपंच निवडल्याने ९० टक्‍के यश मिळेल. २५ टक्‍के सरपंचांनी चांगली कामे केली, तर गावेच्या गावे बदलतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com