फक्त बोलबाला नको... आता हवी कृतीची जोड!

फक्त बोलबाला नको... आता हवी कृतीची जोड!

शिवाजी जन्माला यावा, पण तो दुसऱ्याच्या घरात. असेच प्रत्येकाला वाटते. म्हणजेच कोणतेही चांगले काम झाले पाहिजे, असे वाटते; पण ते दुसऱ्याने केले पाहिजे, अशी अपेक्षा असते. स्वतः पुढाकार घेऊन ते काम पुढे न्यावे, असे फार थोडेच असतात. आपल्याकडे स्वच्छता मोहिमेचे काही असेच झाले आहे. दुसऱ्याने कचरा करू नये, स्वच्छता राखावी, यासाठी आपण अनेकांना उपदेशाचे डोस पाजतो. स्वतः मात्र अस्वच्छता वाढविण्यात मोठा हातभार लावत असतो. व्यक्तिगत स्वच्छतेपासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सगळीकडे थोड्या फार फरकाने असाच अनुभव येतो. स्वच्छतेचे काम फक्त प्रशासनाचे आहे, असाही एक समज आहे. प्रशासनाचे ते काम आहेच; पण व्यक्तिगत प्रत्येकाचीही ती जबाबदारी आहे आणि समाजातील सर्व घटकांच्या समन्वयानेच हा प्रश्‍न मार्गी लागू शकतो, हे कधीतरी लक्षात घ्यायलाच हवे.

कचऱ्याची समस्या सर्वत्रच आहे. किंबहुना भविष्यकाळात ही एक मोठी समस्या होऊ शकते. म्हणून तर स्वच्छता अभियानासाठी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर संकलित होणारा कचरा कुठे टाकायचा, यावरून अनेक ठिकाणी वाद सुरू आहेत. कचरा डेपोसाठी जागा मिळत नाही, मिळालीच तर आजूबाजूच्या गावांच्या आरोग्याच्या प्रश्‍नावरून गंभीर स्थिती निर्माण होते. डेपो हटविण्यासाठी आंदोलने होतात. हे सारे प्रकार आपण अनुभवत आहोत. यावर कायमस्वरूपी उपाय न शोधल्यास भविष्यात तर हे प्रश्‍न अधिक गंभीर होत जाणार आहेत. राज्यातील पालिकांच्या वतीने स्वच्छता अभियानांच्या जाहिरातींचा भडिमार सध्या सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न जाहिरातीच्या पातळीवर अधिक दिसत आहेत. प्रत्यक्षात आणखी खूप गोष्टी होण्याची आवश्‍यकता आहे, हे खरे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. स्वच्छतेचा जागर होण्याबरोबरच कृतीची आवश्‍यकता त्याच्याहून अधिक महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या राज्यात स्वच्छतेसाठी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवून स्पर्धा घेतली त्या काळात अनेक गावांनी हिरिरीने सहभाग नोंदवत स्वच्छतेसाठी योगदान दिले. सध्या या योजनेकडे दुर्लक्ष असल्याने गावांचा पुढाकारही कमी झाला आहे; परंतु निर्मल भारत अभियान, स्वच्छ भारत अभियान यासारख्या योजनांतूनही या कामासाठी पुढाकार घेतला जात आहे. स्वच्छ भारत अभियानातून सध्या शहरी व ग्रामीण दोन्ही भागांत हे प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत अभियानात पहिल्या टप्प्यात शौचालय बांधणी व वापर, दुसऱ्या टप्प्यात घनकचरा व्यवस्थापन व तिसऱ्या टप्प्यात सांडपाणी व्यवस्थापन अशा पद्धतीने मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यात सध्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू आहे. त्यात सातारा जिल्ह्याचे मोठे काम झाले आहे. आता कचरा व्यवस्थापनाचे कामही सुरू झाले आहे. शहरी भागात नगरपालिका, नगरपंचायत किंवा तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू आहेत. काही शहरांनी हागणदारीमुक्त पुरस्कारही पटकाविला आहे. प्रत्यक्षात या शहरांमधील याबाबतचे चित्र अर्धसत्य आहे, हे लोकांनाही समजते, तरीही ते काम पूर्णत्वाच्या दिशेने चालले आहे. या तिन्ही टप्प्यांतील कामे गतीने पूर्ण कशी होतील, याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. पालिकांनी तर या कामाला प्राधान्य द्यायला हवे. कचऱ्याची समस्या आताच गंभीर स्वरूप प्राप्त करू लागली आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन करण्यासाठी गतीची आवश्‍यकता आहे. कचऱ्यापासून खत, वीज, गॅस निर्मिती करण्याचे प्रकल्प कसे राबविता येतील, यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. कऱ्हाड पालिकेने यासाठी काम सुरू केले आहे; पण जिल्ह्यातील इतर पालिकांनी आता अधिक पुढाकार घ्यायला हवा. या संस्थांतील सध्याचा कारभार पाहिला तर किमान स्वच्छतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तरी पुढाकार घेण्याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी स्थिती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांचा पाठपुरावा करण्याबरोबर लोकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्यांचा उपक्रम सुरू आहे; परंतु आपण आपल्या घरातील कचरा घंटागाडीत टाकत नाही. म्हणूनच रस्त्यांवर कचऱ्यांचे ढीग दिसतात. कामावर जाताना गाडीवरूनच कचऱ्याच्या पिशव्या भिरकावणारे आपण तर नाही ना, एवढे आठवून तरी पाहा, मग लक्षात येईल, की हो, आपणही नकळत हा प्रश्‍न वाढविण्यासाठी कारणीभूत आहोत. या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सवय आपण लावून घेत नाही. ओला व सुका कचरा, प्लॅस्टिकचा कचरा वेगळा केला जात नाही. प्रत्येक कुटुंबाने ही शिस्त स्वतःला लावून घेतली पाहिजे.

वर्गीकरण केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्यादृष्टीने संस्थांनी व्यवस्था करण्याची भूमिका बजावली पाहिजे. सर्वच घटकांनी योग्य पद्धतीने योगदान दिले तरच आपली गावे स्वच्छ व सुंदर राहू शकतात. अन्यथा अस्वच्छतेच्या नरकात जगून औषधांसाठी पैसा खर्च करण्याची तरतूद यापुढे प्रत्येकाला करावी लागेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर पुढाकार घेण्याबरोबरच आपापल्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्वच्छतेसाठी योग्य पाठपुरावा करणे भाग आहे. जाहिरातींद्वारे बोलबाला होईल; पण प्रत्यक्षात गावे स्वच्छ व सुंदर होण्यासाठी फक्त प्रामाणिक कृतिपूर्ण प्रयत्नांचीच आवश्‍यकता आहे. गावागावांतील युवकांच्या संघटना, सामाजिक काम करणाऱ्या संघटना- संस्था, मंडळांनीही या कामासाठी जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. हे सारे करण्यासाठी आपली मने स्वच्छ असायाला हवीत. त्या वेळीच चांगल्या कामाची उभारणी होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com