ठोसेघर धबधब्याला पर्यटकांचा वेढा! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

सातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि स्वच्छ हवामान; एखाद्याचे मन रमायला आणखी काय हवे? मोसमी पावसाच्या आगमनाने केवळ माणूसच नव्हे, तर येथील निसर्गही शहारला आहे. हे शहारलेपण जवळून अनुभवण्यासाठी महाबळेश्‍वर- पाचगणीचबरोबर कास पठार, बामणोली, सज्जनगड- ठोसेघर, कोयनानगर येथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. 

महाराष्ट्राचे चेरापुंजी महाबळेश्‍वर, पाचगणीचे टेबललॅंड, मिनी काश्‍मीर तापोळा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, निसर्गरम्य कांदाटी खोरे, जागतिक वारसास्थळाचा दर्जा अभिमानाने मिरवणारे कास पठार व कोयना अभयारण्य या निसर्ग स्थळांबरोबरच पवन ऊर्जा प्रकल्पाचे जाळे असलेले चाळकेवाडी, छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष प्रतापगड किल्ला, सज्जनगड, अजिंक्‍यतारा किल्ला ही रम्य व ऐतिहासिक स्थळे पावसाळी पर्यटनस्थळे पर्यटकांची आकर्षण केंद्रे बनली आहेत. मंगळवार, शनिवार, रविवार, तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी या निसर्ग पर्यटन स्थळांकडे वाहनांची रीघ लागलेली दिसते. शनिवार सायंकाळी ही कास रस्त्यावर जणू वाहनांची जत्रा भरल्यासारखी भासते. पावसात चिंब भिजत भाजलेली मक्‍याची कणसे, भाजक्‍या शेंगा, फेसाळलेला चहा, गरमागरम भजी असे बेत रस्त्याकडेच्या टपऱ्या आणि छोट्या हॉटेलवर शिजत आहेत. यवतेश्‍वर, कास पठार, कोयना नगर आदी ठिकाणी छोटे- छोटे धबधबे पाहायला मिळत आहेत. डोंगरदऱ्यातून पांढऱ्याशुभ्र फेसाळपाण्याचे धबधबे कोसळताना पाहून पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू झालेला पाऊस अधूनमधून उघडीप देत असल्याने पर्यटकांचा उत्साह वाढत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news thoseghar waterfall