अशी केली पाण्याची बचत...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

‘‘उन्हाळा सुरू झाला, की पाणीबचतीबाबत चर्चा घडू लागतात. मुळात सर्वच ऋतूंमध्ये आपण पाणी वापर व त्याच्या बचतीबाबत गंभीर असले पाहिजे. पाणी हा केवळ जगण्याचा नव्हे तर सजीवांच्या अस्तित्वाचा भाग आहे....’’ पाणी बचतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेल्या साताऱ्यातील काही सजग नागरिकांनी प्रातिनिधिक स्वरूपात ‘सकाळ’च्या व्यासपीठावर आपली मते व कृती मांडली. त्याचा गोषवारा...

‘‘उन्हाळा सुरू झाला, की पाणीबचतीबाबत चर्चा घडू लागतात. मुळात सर्वच ऋतूंमध्ये आपण पाणी वापर व त्याच्या बचतीबाबत गंभीर असले पाहिजे. पाणी हा केवळ जगण्याचा नव्हे तर सजीवांच्या अस्तित्वाचा भाग आहे....’’ पाणी बचतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेल्या साताऱ्यातील काही सजग नागरिकांनी प्रातिनिधिक स्वरूपात ‘सकाळ’च्या व्यासपीठावर आपली मते व कृती मांडली. त्याचा गोषवारा...

सोसायटीस मिळाली पाण्याची स्थिरता  
सौ. सुनीता जाजू (रा. सदरबझार) - मी सदरबझारमधील आर्चिज अपार्टमेंटमध्ये राहाते. आमच्या परिसरातील भूगर्भातील पाणीपातळी खालावली असल्याचे बऱ्याच जाणकारांनी सांगितले होते. त्यामुळे चार वर्षांपूर्वी आमच्या अपार्टमेंटमधील रहिवाशांनी इमारतीस रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला. निसर्गपूरक गोष्टी करण्याचा माझा नेहमीच कटाक्ष असतो. पाणी हा तर सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हा उपक्रम राबविल्यापासून आमच्या सोसायटीला पाण्याची स्थितरता नक्कीच मिळाली आहे. परिसरातील, तसेच शहरातील इतर नागरिकांनी पाणी बचतीचे विविध मार्ग अवलंबून पावसाळ्यात वॉटर हार्वेस्टिंग केल्यास त्याचा लाभ वैयक्तिक, तसेच सार्वजनिक स्तरावर होणार आहे. 

ऊर्जा, पाणीबचतीसाठी ‘गुरुकुल’तर्फे स्पर्धा 
राजेंद्र चोरगे (गुरुकुल स्कूल, अध्यक्ष) - गुरुकुल स्कूलमध्ये पाणी व ऊर्जा बचतीचे विविध उपक्रम राबविले जातात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत. पाण्यासाठीची समृद्धता व त्याचे महत्त्व त्यांना लक्षात यावे. यासाठी गुरुकुल स्कूलने रेनवॉटर हार्वेस्टिंग केले आहे. त्यामुळे शाळा व परिसरातील भूगर्भातील पाणीपातळीत कमालीची वाढ जाणवते. पाण्याचा प्रत्येक थेंब हा प्रत्येक नागरिकाने साठवला पाहिजे. शाळेतील मुलांचे ऊर्जा व पाणी बचतीसाठी स्पर्धा घेण्याचे काम गुरुकुल स्कूल मागील तीन वर्षांपासून करत आहे.

पाण्याचा प्रत्येक थेंब साठवल्याचे समाधान
उदय मोदी (पेढे व्यावसायिक) -
 पर्यावरणपूरक बाबीसाठी आम्ही नेहमीच आग्रही असतो. प्लॅस्टिक पिशव्यांवर आता बंदी आली असली, कॅरिबॅग वापरण्याला आज सर्वांचाच विरोध असला, तरी १५ वर्षांपूर्वीच आमच्या वडिलांनी दुकानात कॅरिबॅग हद्दपार केली होती. पिताजींच्या याच संस्कारातून पाणी वाचविण्यासाठी आपण काहीतरी करावे असे मला नेहमी वाटायचे. त्यातूनच मी घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले. सुमारे एक हजार चौरस फुटाचे छत्र रेन वॉटरसाठी उपयोगात आणले. घराच्या परिसरात असणाऱ्या बोअरवेलचे पुनर्भरण केले. आता पाण्याचा प्रत्येक थेंब साठवत असल्याचे समाधान मला मिळते. 

प्रत्येक इमारतीस ‘रेन वॉटर’ उपक्रम 
महेश कोकीळ (बांधकाम व्यावसायिक) -
 बांधकाम व्यवसाय करताना होणाऱ्या प्रत्येक इमारतीस मी नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करण्यासाठी आग्रही असतो. त्यातूनच रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पाण्यासाठी प्रत्येकाला स्वयंपूर्ण होता येईल. गरज आहे ती थोडे पुढे येऊन व भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन प्रत्येकाने पाणी बचतीचे विविध उपाय अंगीकारले पाहिजेत. बांधकाम व्यवसायात पाण्याचा प्रत्येक थेंब साठावा, यासाठी माझ्या प्रत्येक इमारतीस रेन वॉटर हार्वेस्टिंग करून देतो.  त्याचबरोबर जंगल भागातील वन्यजीवांसाठी पाण्याचे नैसर्गिक साठे उन्हाळ्यापर्यंत जीवंत राहावेत, यासाठी वाहणाऱ्या पाण्याला बांध घालून ते शास्त्रीयदृष्ट्या आडवण्यासाठी मी प्रयत्नशील असतो. 

टॅंकर मागविण्याची वेळ आली नाही
पंकज टोणपे (सचिव, आनंदवन गृहनिर्माण संस्था, व्यंकटपुरा पेठ) -
 आमच्या अपार्टमेंटमध्ये १०३ सदनिका आहेत. सुमारे ४०० रहिवाशांचे आमचे एक कुटुंबच म्हणा ना. जानेवारी उजाडला, की आमच्या अपार्टमेंटसाठी टॅंकरच्या घिरट्या सुरू व्हायच्या. दिवसाला तीन टॅंकर लागायचे. दोन वर्षांपूर्वी आम्ही रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविली. सुमारे दहा हजार चौरस फुटांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी गोळा करून आम्ही अपार्टमेंटच्या तीन बोअरवेल व एका विहिरीत सोडले. हा खर्च आम्ही सोसायटीच्या नियमित खर्चातून भागविला. गेल्या दोन वर्षांत आमच्यावर टॅंकर मागविण्याची वेळ एकदाही आली नाही. पाण्याच्या बाबतीत सर्वच अपार्टमेंटनी हा निर्णय घ्यावा. थोडा खर्च केला तर भविष्यात पाण्यावर होणारा मोठा खर्च व व्याप वाचणार आहे. सार्वजनिक व्यवस्थेवरील तुमचे अवलंबित्व कमी होणार आहे. 

पाणी वाचविण्याची प्रेरणा मिळाली 
आर. एल. पारंगे (व्यावसायिक) -
 अतिपावसाचा प्रदेश व कायम टंचाईचा प्रदेश असे दोन्ही भाग सातारा जिल्ह्यात आहेत. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय पाहिल्यानंतर मन खिन्न होते. रस्त्यावर सडा मारणे, वाहत्या नळाखाली गाड्या धुणे, पाण्याची भांडी भरून वाहने आदीच्या माध्यमातून पाण्याचा अपव्यय लोक करत असतात. त्यातूनच पाणी वाचविण्याची प्रेरणा मिळाली. माझे घर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करून घेतले. यामध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी बोअरवेल व स्वतंत्र हौद या दोन्ही मध्ये सोडण्यात आली आहे. सार्वजनिक व्यवस्थेवरील माझा ताण कमी करण्याचा माझा छोटा प्रयत्न आहे. 

टॅंकरची संख्या आली निम्म्यावर 
अभिजित घार्गे (बांधकाम व्यावसायिक, सातारा) -
 मी राहात असलेल्या अपार्टमेंटमध्ये सहा फ्लॅट आहेत. उन्हाळ्यात पाण्याअभावी हाल सुरू झाले. प्राधिकरणाचे पाणी पुरायचे नाही. सोसायटीच्या दोन बोअरवेल आहेत; परंतु फेब्रुवारी महिना सुरू झाला, की पाण्याला ओढ लागायची. मे महिना तर कसाबसा जायचा. पाण्याच्या प्रश्‍नावर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करण्याची सोसायटीने ठरविले. रवींद्र सासवडे यांच्या मदतीने रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्यात आली. पहिल्याच वर्षी आम्हाला लागणारी टॅंकरची संख्या निम्म्यावर आली. जमिनीतील पाणीपातळी वाढावी यासाठी आमच्या इमारतीमधील प्रत्येक सभासद आपापले योगदान देत असतो. हा प्रयोग आम्ही दहा- पंधरा वर्षांपूर्वी करायला हवा होता. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येक नागरिकाने आपले घर- इमारतीच्या छतावर पडणारे पाणी गोळा करून बोअरवेलचे पुनर्भरण करावे. तुम्हाला पाणी कधीही कमी पडणार नाही.

Web Title: satara news water saving