
गोंदवले (जि. सातारा) : "लॉकडाउन'च्या काळात पक्ष्यांचा संचार वाढल्याने पक्षी निरीक्षणास चांगली संधी आहे. याचा फायदा घेऊन किरकसाल (ता. माण)
येथील जैवविविधता टिकविण्यासाठी निसर्गप्रेमी तरुणांची रानोमाळात भटकंती सुरू आहे. विशेषतः पक्षी निरीक्षणाच्या नोंदी थेट "ई बर्ड' या वेबसाईटवर करण्यात येत असल्याने किरकसाल गाव जागतिक पातळीवर पोचू पाहत आहे.
साधारणतः दीड हजार लोकसंख्येचे किरकसाल गाव आदर्श गाव योजनेसाठी निवड झाल्याने राज्याच्या नकाशावर चमकले. एकोप्याने होणाऱ्या सामाजिक कामांमुळे गाव विकासाचा मार्ग चोखळत आहे. याचाच एक भाग म्हणून गाव कुशीत जैवविविधता टिकवण्यासाठी पक्षी निरीक्षण करून नोंदी केल्या जात आहेत. नागपूरच्या महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या वतीने बनविण्यात येणाऱ्या नोंदवहीत येथील नोंदी करण्यात येत आहेत. त्यासाठी विकास काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षिमित्र व जीवशास्त्राचा अभ्यासक चिन्मय सावंत याच्यासह गावातील विशाल काटकर, विजय शिंदे, अनुष्का सावंत यांची एक "टीम' काम करत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला. अनेकांप्रमाणेच चिन्मय सावंतदेखील गावी परतला. नियमाप्रमाणे होम क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करून तो या "टीम'सोबत पुन्हा पक्षी निरीक्षणाच्या कामाला लागला आहे. किरकसाल गावालगतच्या शिवारामध्ये या "टीम'चा आता पक्षी निरीक्षणाचा नित्यक्रम सुरू आहे. सध्याच्या लॉकडाऊउनच्या काळात या "टीम'ला पक्ष्यांच्या नव्या 70 हून अधिक जाती शोधण्यात यश मिळाले आहे. यामध्ये सामान्य लावा, भारतीय राखाडी धनेश, लांब-शेपटीचा खाटिक, कापशी घार, पांढऱ्या भुवईचा धोबी, पिवळा धोबी, निळा माशीमार, भारद्वाज, गप्पीदास, काळा शराटी यांचा समावेश आहे. तसेच ठिपकेवाली तुतारी, सामान्य तुतारी, रंगीत करकोचा, संकट समीप प्रजाती, पांढऱ्या मानेचा करकोचा हे स्थलांतरित पक्षी देखील शोधण्यात आले आहे. या पक्ष्यांच्या नोंदी गावाच्या वेबसाईटसह ई बर्ड या वेबसाईटवर करण्यात येत आहेत. त्यामुळे जगभरातील पक्षी निरीक्षकांसाठी चांगला उपयोग होत आहे. परिणामी किरकसालचे नाव जागतिक पातळीवर पोचले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाचाही प्रयत्न...
काही पक्ष्यांबाबत आपल्याकडे काही गैरसमज आहेत. त्यातून अंधश्रद्धासुद्धा जोपासली जाते. परंतु, पक्ष्यांविषयीची योग्य माहिती लोकांपर्यंत पोचवून येथे अंधश्रद्धा निर्मूलनदेखील करण्यात येत आहे. शिवाय सध्या पाणीसाठे कोरडे पडले असल्याने घरासमोर व परसबागेत पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न या "टीम'कडून करण्यात येत आहे.
""लॉकडाउनच्या काळात जैवविविधता टिकविण्यासाठी पक्षी निरीक्षणाचे काम करत असून, यातून किरकसालच्या विकासासाठी हातभार लागत असल्याने खूप आनंद मिळत आहे.''-चिन्मय सावंत, पक्षिमित्र, किरकसाल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.