सौंदत्ती यल्लम्मा, चिंचली मायाक्का मंदिर पुन्हा बंद 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 February 2021

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, अचानक निर्णयामुळे हजारो भाविक डोंगरावर 

बेळगाव :  सौंदत्ती येथील रेणुका देवी (यल्लम्मा) व रायबाग तालुक्‍यातील चिंचली मायक्का देवीचे दर्शन भाविकांसाठी बंद झाले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी याबाबतचा आदेश शनिवारी (ता. 20) सायंकाळी बजावला. दरम्यान, सौंदत्ती यात्रेनिमीत्त लाखो भाविक डोंगरावर असून अचानक आलेल्या आदेशामुळे जोगणभावीकडून यल्लम्मा मंदिराकडे जाणारा रस्ता रात्री नऊ वाजता बंद करण्यात आला. यामुळे भाविकांची रात्री तारांबळ उडाली. 

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर सौंदत्ती मंदिर भाविकांना खुले ठेवावे की नाही, यावर शुक्रवारपासून स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली होती. शुक्रवारी दिवसभरात अडीच लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. तर शनिवारी मंदिराचे सीईओ रवी कोटारगस्ती यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली होती. त्यामुळे मंदिर बंद ठेवावे की नाही हा निर्णय सोमवारी घेतला जाणार होता. याबाबत मंदिराच्या सीईओंनीही स्पष्टीकरण दिले होते. पण, सायंकाळी अचानक मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर किती दिवस बंद राहणार याबाबत अद्याप स्पष्टता नसून जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, माघी यात्रेनिमीत्त डोंगरावर गर्दी असून यात कर्नाटकासह महाराष्ट्रातील भाविकांची संख्या अधिक आहे. बेळगावातून सुमारे एक लाखाहून अधिक भाविक सध्या डोंगरावर असून अचानक झालेल्या निर्णयामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जोगणभावीकडून व सौंदत्ती येथून मंदिराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला. तसेच येथे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. रात्री उशीरा झालेल्या निर्णयामुळे भाविक डोंगरावरच अडकून पडले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येण्यापूर्वीच दर्शनासाठी सुमारे पंधरा हजाराहून अधिक भाविक रांगेत थांबले होते. रस्ते जरी बंद करण्यात आले तरी भाविकांना तातडीने दर्शन देऊन मंदिराबाहेर पडण्याची सूचना केली जात होती. रात्री उशीरापर्यंत भाविक डोंगरावर अडकले होते. मंदिर भाविकांसाठी बंद झाल्याचा विषय डोंगरावर पसरताच भाविकांनी शेवटच्या दर्शनासाठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ गोंधळ झाला. पोलिसांनी मंदिर परिसरातील सर्व भाविकांना रात्रीच मंदिर परिसर रिकामे करण्याची सूचना केल्याने रात्रीच अनेक भाविकांनी डोंगर सोडण्यास सुरवात केली. 

रेणुका देवीचे दर्शन भाविकांना बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. त्यानुसार त्याची अंमलबवाजणी करण्यात आली आहे. एक फेब्रुवारी रोजीच मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. केवळ वीस दिवस भाविकांना देवीचे दर्शन घेता आहे. 
- रवी कोटारगस्ती, सीईओ रेणुका मंदिर, सौंदत्ती 

चिंचली यात्रेवर प्रश्‍नचिन्ह 
रायबाग  मायाक्का चिंचली (ता. रायबाग) येथे मायाक्का देवीचे दर्शन भाविकांसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी बजावले. त्यानंतर मंदिर परिसर बंद करण्यासाठी ट्रस्टकडून हालचाली सुरू झाल्या होत्या. चिंचलीतील यात्रा 26 पासून सुरू होणार आहे. मुख्य नैवेद्य 2 मार्च रोजी आहे. त्यात महाराष्ट्रातील भाविकांची संख्या अधिक असायची. यंदा त्यांच्या प्रवेशावर निर्बंध आल्याने यात्रा होणार की नाही, याबद्दल कर्नाटकातील भाविकही साशंक आहे.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saundatti Yellamma Chinchali Mayakka temple closed belgaum marathi news