esakal | कॉंग्रेसतर्फे शुक्रवारपासून आंदोलन; किसान-मजदूर बचाव दिवस पाळणार : पृथ्वीराज पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Save Farmers and workers day; Agitation by Congress will start by Friday : Prithviraj Patil

केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन कायदे तसेच कामगार विरोधी कायद्याला कॉंग्रेसने तीव्र विरोध केला आहे. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी पक्ष आक्रमकपणे आंदोलन करत आहे.

कॉंग्रेसतर्फे शुक्रवारपासून आंदोलन; किसान-मजदूर बचाव दिवस पाळणार : पृथ्वीराज पाटील

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन कायदे तसेच कामगार विरोधी कायद्याला कॉंग्रेसने तीव्र विरोध केला आहे. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी पक्ष आक्रमकपणे आंदोलन करत आहे. शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीनेही शुक्रवारपासून (2 ऑक्‍टोबर) तीव्र आंदोलन केले जाईल, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले, ""शेतकरीविरोधी कायद्यांविरोधात कॉंग्रेसने पुकारलेल्या राजव्यापी आंदोलनाच्या तयारीसाठी जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारींची ऑनलाईन बैठक महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्र सरकारने घाईघाईने मंजूर केलेली विधेयके शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारी आहेत. त्यांना हमीभावाचे संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या बाजार समित्या केंद्र सरकारने मोडित काढल्या आहेत. नव्या कायद्यामुळे खासगी व्यापाऱ्यांचे भले होणार आहे. शेतमाल कवडीमोलाने घेतला जाईल. हा धोका ओळखून शेतकऱ्यांच्या हितासाठी कॉंग्रेसने आक्रमक जनआंदोलन उभे केले आहे.' 

ते म्हणाले, "प्रदेश कॉंग्रेसच्या सुचनेनुसार 2 ऑक्‍टोबरला राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालय, विधानसभा मतदारसंघात धरणे आंदोलन केले जाणार आहे. कृषी विधेयकाबरोबरच केंद्राने कामगार कायद्यातही अमुलाग्र बदल केलेत. त्यामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे. कॉंग्रेसने केलेल्या कामगार कायद्यांमुळे अनेक हक्क प्राप्त झाले होते. कंत्राटी कामगार कायम होत होता. परंतु नव्या कायद्यामुळे कायम कामगारही कंत्राटी होणार आहे. कामगारांना गुलाम बनवणारा हा कायदा आहे. म्हणून शेतकरी व कामगार यांच्या पाठीशी राहण्यासाठी 2 ऑक्‍टोबर रोजी "किसान- मजदूर बचाव दिवस' पाळला जाईल.' 

शेतकरी सह्यांची मोहीम 
ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भव्य व्हर्च्युअल किसान रॅलीचे आयोजन केले आहे. 2 ते 30 ऑक्‍टोबरअखेर राज्यात एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम राबवली जाईल. महापालिका क्षेत्रातून एक लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दिले जाईल. काळ्या कायद्याविरोधात कॉंग्रेसचा संघर्ष सुरूच राहील. सांगलीत 2 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन करून धरणे आंदोलन केले जाईल. 

संपादन : युवराज यादव