
सांगली ः सप्रेम जय जिनेंद्र... सांगलीतील व्यापारी प्रदीप पाटील यांचे चिरंजीव अभिनव आणि हेर्ले (जि. कोल्हापूर) येथील सुरेश चौगुले यांची कन्या चि. सौ. कां. सायली... यांचा विवाह सोहळा सुरु आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला या आनंद क्षणात प्रत्यक्ष बोलावू शकत नाही... मात्र तुम्ही वऱ्हाडी व्हायचंच आहे. त्यासाठी या लिंकवर क्लीक करा आणि पहा सायली-अभिनवचा लाईव्ह विवाह सोहळा खास यू-ट्यूबवर...
ही पत्रिका गेल्या काही दिवसांपासून सांगलीत जोरदार चर्चेत होती आणि आज प्रत्यक्ष सायली-अभिनवचा छोटेखानी विवाह सोहळा संपन्नही झाला. दोन्हीकडील पाहुणे मनात थोडी धास्ती घेऊनच आले. सारे सुरळित व्हावे, हीच प्रार्थना करत सारे जमले. हळद लागली, ओटी भरली... सप्तपदी झाली अन् वरमाला घातल्या गेल्या. त्याने मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधत सातजन्मी साथ देण्याची शपथ घेतली.
टाळ्यांचा कडकडाट झाला. वधूकडचे पंधरा आणि वराकडी 25 अशा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा आनंदसोहळा याचि देही पाहण्यासाठी शेकडो पाहूणे यू-ट्यूबवर हजर होते. आता त्यांच्या हातावर पाणी काही पडले नाही, पंगत काही उठली नाही, मात्र नव वधू-वरांच्या डोक्यावर अक्षतांचे ऑनलाईन रोपन मात्र जोरकस झाले. सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील या सोहळ्याला हजर होते.
तीन महिन्यांपूर्वी या लग्नाच्या गाठी बांधल्या गेल्या होता. लग्नसोहळा सांगलीकरांच्या लक्षात राहील, असाच करायचे ठरले होते. तोवर कोरोना साथीने डोके वर काढले आणि जग हादरुन गेले. लग्न लांबणीवर पडले. पण, किती काळ लांबणीवर टाकणार? अखेर ठरले. 18 मेचा मुहुर्त ठरला आणि नेमिनाथनगर येथील राजमती भवनमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, प्रत्येकाच्या हातावर डाळ-गूळाऐवजी सॅनिटायझर देऊन स्वागत झाले.
पाहुण्याच्या गाठीभेटीही गळाभेट न करता सुरक्षित अंतर ठेवून झाल्या. रेड झोनमधला कुठलाही पाहुणा इकडे फिरकू नये, याचीही पुरेपुर काळजी घेण्यात आली होती. हे सारे प्रेक्षेपण थेट सुरु होते यू-ट्यूबवर. अनेकांनी ते पाहिले. त्यासाठीची लिंकही जोरदार व्हायरल झाली. लॉकडाऊनने लोकांना काय काय करायला लावले आणि अजून काय काय करायचे बाकी आहे, याचीच चर्चा लग्नमंडपातही रंगली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.