
कांदा बियाणांचा दर प्रतिकिलो ४,२५० ते ५,५०० रुपयांवर पोचला आहे.
बेळगाव : कांद्याने ग्राहकांपाठोपाठ आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आणले आहे. अतिवृष्टी, लॉकडाउन, कर्ज आणि हवामानातील बदलामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. हवामान बदलामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून उभारी घेत शेतकरी पुन्हा कांदा उत्पादनासाठी पुढे आले असतानाच बियाणांचे दर वाढले आहेत. कांदा बियाणांचा दर प्रतिकिलो ४,२५० ते ५,५०० रुपयांवर पोचला आहे. त्यामुळे, कांदा उत्पादन घ्यावे की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात पडलेल्या अवकाळी पावसामुळे यंदा कांदा बियाणांचे अपेक्षित उत्पादन झालेले नाही. तसेच कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले. दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा बियाणांसाठी न ठेवता शिल्लक कांद्याची विक्री केली. त्यामुळे, सध्या बियाणांचा तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र आता चांगला दर मिळत असल्याने आता शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी बियाणांचा शोध सुरु केला आहे. मात्र, बाजारात मागणी अधिक व पुरवठा कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे, बियाणांचा तुटवडा जाणवत आहे. साहजिकच कांदा बियाणांचा दरही वाढला आहे.
हेही वाचा - वर्ष पूर्ण होण्याआधीच प्राथमिक शिक्षक संघात उभी फूट -
गेल्या चार ते पाच वर्षात कांद्याचा दर दरवर्षी ५०० ते १,००० रुपयांनी वाढला आहे. सध्या कांदा बियाणांचा दर प्रति किलो ५,५०० रुपयांवर पोचला आहे. गत दोन वर्षात कांद्याचा प्रति क्विंटलचा दर ९,४५० ते १४,५०० रुपयांपर्यंत पोचला होता. यंदाही कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. पण, अतिवृष्टीमुळे शेतकरी नुकसानीत राहिले आहेत. दरवर्षी चांगला दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य देण्यास सुरवात केली आहे.
त्यामुळे, बियाणांचा तुटवडा भासत असून दरही वाढला आहे. पण, बदलते हवामान आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे बियाणांची अधिक दराने खरेदी करून जरी उत्पादन घेतले तरी परतावा कितपत मिळेल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये सांशकता आहे. हवामानातील बदलांमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळत असल्याने अधिक दराने बियाणे खरेदी करुन लागवड केली तरी बाजारपेठेत आवक वाढून कांद्याचे दर पडण्याचाही धोका आहे. त्यामुळे, शेतकरी सध्या संभ्रमात आहेत.
हेही वाचा - नियम धाब्यावर बसवुन निकृष्ठ दर्जाच्या आहाराचे वितरण करणाऱ्या गोदामला लागले सील
"घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत कांद्याला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे, कांदा बियाणांच्या दरातही वाढ होत आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर बियाणे तयार करणाऱ्या विविध कंपन्यांवर दराबाबत नियंत्रण आवश्यक आहे."
- डॉ. के. कोडीगौड, सचिव, एपीएमसी
संपादन - स्नेहल कदम