मित्राचा त्रास पाहून त्याने बनवली कोरोना व्हीलचेअर; लॉकडाउनमधील वेळेचा सदुपयोग

शंकर भोसले
Wednesday, 8 July 2020

कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाउन काळात रिकाम्या वेळेत नामी शक्कल लाढवत सुभाषनगर (ता. मिरज) येथील आमिर खान तरुणाने दिव्यांगांसाठी बॅटरीवरील इलेक्‍ट्रिक व्हीलचेअर तयार करून दिव्यांगांना परिश्रम विरहित प्रवास करण्याचा आनंद देण्याचा प्रयत्न आहे.

मिरज (जि . सांगली) ः कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाउन काळात रिकाम्या वेळेत नामी शक्कल लाढवत सुभाषनगर (ता. मिरज) येथील आमिर खान तरुणाने दिव्यांगांसाठी बॅटरीवरील इलेक्‍ट्रिक व्हीलचेअर तयार करून दिव्यांगांना परिश्रम विरहित प्रवास करण्याचा आनंद देण्याचा प्रयत्न आहे. याचे नामकरण देखील कोरोना व्हीलचेअर असेच ठेवले आहे. हा तरुण सध्या पुणे येथील टाटा मोटर्स कंपनीमध्ये अभियंत्ता म्हणून कार्यरत आहे. पहिल्यापासून दिव्यांगासाठी काहीतरी नवीन कार्य करण्याच्या इच्छेतून त्याने लॉकडाउनच्या काळात या संकल्पनेवर काम केले. 

शिक्षण घेत असताना पेट्रोल/बॅटरी व सौर ऊर्जेवर चालणारी हायब्रिड इलेक्‍ट्रिक कार त्याने तयार केली होती. या कारला केपीआयटी पुणे या कंपनीची मान्यता प्राप्त झाली. याच अनुभवाच्या जोरावर आमिरने इलेक्‍ट्रिक व्हीलचेअरचे मॉडेल तयार केले. एप्रिल ते जून लॉकडाउन काळात अथक प्रयत्नाने त्याने या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. यासाठी त्याने उपयुक्‍त टाकावू वस्तूंचा वापर केला. ही व्हीलचेअर तीन चाकी असून बॅटरीवर चालते. बॅटऱ्या एकदा चार्ज केल्यावर पन्नास किलोमीटर फिरते. चालवताना कोणत्याही आवाजाचा त्रास होत नसून, दिव्यांगांना उपयुक्त ठरणार आहे. 

दिव्यांगांना अपंगत्वामुळे नैसर्गिक विधी करता येत नाही की उठून बसता, फिरता येत नाही. अशा परिस्थितीत आई-वडिलांनाच व्हीलचेअरवरून ढकलत फिरवावे लागते. त्यांच्यासाठी सदर तयार केलेली इलेक्‍ट्रिक व्हीलचेअर उपयुक्त ठरणार आहे. ही व्हीलचेअर त्याने सुभाषनगर येथील आपला मित्र जुबेर कमालपाशा शेख याला सुपूर्द करण्यात आली. 

मित्राला होणाऱ्या त्रासातून केला संकल्प 
आमिर सध्या पुणे येथील टाटा मोटर्स कंपनीमध्ये इलेक्‍ट्रिकल अभियंता म्हणून कार्यरत आहे. "माझे सुभाषनगर येथील दिव्यांग मित्र जुबेर कमालपाशा मी गावी आल्यास कोणास तरी सोबत घेऊन व्हीलचेअर ढकलत माझ्याकडे यायचा. यावेळी त्यांना झालेला त्रास असह्य होत असतो. तेव्हापासून दिव्यांगांसाठी हायटेक व्हीलचेअर बनवण्याचा संकल्प केला. लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या मोकळ्या वेळात टाकावू वस्तूंमधून या व्हीलचेअरचा संकल्प पूर्ण झाला', असे आमिरने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seeing his friend's trouble, he made a Corona wheelchair