पंचायत समितीच्या  कारभाऱ्यांची निवड

selection of the Chairman of Panchayat sammittee
selection of the Chairman of Panchayat sammittee

श्रीरामपुरात सभापती निवडीवर हरकत

श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदी संगीता शिंदे, तर उपसभापतिपदी बाळासाहेब तोरणे यांची निवड झाली. विखे यांच्या गटाला माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची मदत झाली. ससाणे गटाच्या शिंदे ऐनवेळी विखे गटाला मिळाल्याने त्यांची सभापतिपदावर वर्णी लागली. त्या बाजार समितीच्याही सभापती आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या निवडीवर ससाणे गटाच्या डॉ. वंदना मुरकुटे यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे ही निवड न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्‍यता आहे. 

संगमनेरात कॉंग्रेसचेच वर्चस्व कायम

संगमनेर पंचायत समिती सभापतिपदी कॉंग्रेसच्या सुनंदा बाळासाहेब जोर्वेकर यांनी, तर उपसभापतिपदी नवनाथ धोंडीबा अरगडे बहुमताने विजयी झाले. पंचायत समितीतील 18 पैकी कॉंग्रेसचे 15, शिवसेनेचे 2 व भाजपचा 1 सदस्य आहे. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार आल्याने शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे सभापतिपदासाठी कॉंग्रेसच्या जोर्वेकर, शिवसेनेच्या आशा इल्हे यांनी अर्ज केला होता. उपसभापतिपदासाठी नवनाथ अरगडे व अशोक सातपुते यांनी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीत सुनंदा जोर्वेकर व नवनाथ अरगडे यांना प्रत्येकी 13 मत मिळाली. अशोक सातपुते व आशा इल्हे यांना प्रत्येकी 5 मते मिळाली. 

राहात्यात सत्तेचा समतोल साधला

राहाता पंचायत समितीच्या सभापतिपदी विखे समर्थक नंदा तांबे यांची, तर उपसभापती ओमेश जपे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीवर विखे गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. सभापतिपद प्रवरा परिसराला, तर उपसभापतिपद गणेश परिसराला देऊन विखे पाटील यांनी सत्तेचा समतोल कायम ठेवला. 

शेवगावात पुन्हा एकदा डॉ. क्षितिज घुले

शेवगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी पुन्हा डॉ. क्षितिज नरेंद्र घुले, तर उपसभापतिपदी नूतन राहुल भोंगळे यांची बिनविरोध निवड झाली. याआधी डॉ. घुले हेच सभापती होते. सभापतिपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी होते. त्यात डॉ. घुले यांची फेरनिवड झाली. पंचायत समितीत सर्व आठही सदस्य "राष्ट्रवादी'चेच आहेत. 

अकोल्यात पिचड यांचे वर्चस्व कायम

अकोले पंचायत समिती सभापतिपदी माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे दत्तात्रेय बोऱ्हाडे यांची, तर उपसभापतिपदी दत्तात्रेय देशमुख यांची बहुमताने निवड झाली. पंचायत समितीवर पुन्हा पिचड यांचे वर्चस्व सिद्ध झाले. विधानसभेला पराभव झाल्याने खचलेली पिचड समर्थकांना या निवडीमुळे नवसंजीवनी मिळल्याचे चित्र होते. 

पारनेरमध्ये उपसभापतिपदासाठी निवडणूक

पारनेर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे गणेश शेळके यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या सुनंदा सुरेश धुरपते यांनी सहा विरुद्ध चार मतांनी विजय मिळविला. त्यांनी दिनेश बाबर यांचा पराभव केला. सुनंदा धुरपते यांनी दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले होते. उपसभापतिपदासाठी कॉंग्रेसचे दिनेश बाबर यांनीही अर्ज दाखल केला. धुरपते यांनी सभापतिपदाचा अर्ज मागे घेतल्याने शेळके यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. उपसभापतिपदासाठी हात उंचावून मतदान झाले. त्यात धुरपते यांनी बाजी मारली. 

राहुरी "राष्ट्रवादी'च्याच ताब्यात

राहुरी पंचायत समितीच्या सभापतिपदी बेबी सोडनर, उपसभापतिपदी प्रदीप पवार यांची बिनविरोध निवड झाली. समितीची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. विरोधी विखे गटाचे सदस्य उदयसिंह पाटील, सुरेश बानकर व वैशाली अंत्रे निवड सभेस अनुपस्थित होते. त्यामुळे दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध झाल्या. 

श्रीगोंद्यात भाजपला झटका

श्रीगोंदे पंचायत समितीच्या सभापतिपदी गीतांजली पाडळे व उपसभापतिपदी रजनी देशमुख यांची निवड झाली. दोघीही राष्ट्रवादीच्या सदस्य आहेत. बहुमत असतानाही एक सदस्य अपात्र झाला आणि दुसरा फुटल्याने भाजपला पंचायत समितीची सत्ता गमवावी लागली. माजी आमदार राहुल जगताप यांची जादू चालली. त्यांनी विखे पाटील गटाच्या सदस्यांना सोबत घेत भाजपच्या हातून सत्ता हिसकावली. 

नगरमध्येही भाजपची माघार

नगर तालुका पंचायत समिती सभापतिपदी महाविकास आघाडीच्या कांताबाई कोकाटे, तर उपसभापतिपदी रवींद्र भापकर यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या सभापतिपदाच्या उमेदवार स्वाती कार्ले व उपसभापतिपदाच्या उमेदवार बेबी पानसरे यांनी संख्याबळ कमी असल्याने माघार घेतली. 

कोपरगावात बिनविरोध निवड

कोपरगाव पंचायत समिती सभापतिपदी पौर्णिमा राहुल जगधने, तर उपसभापतिपदासाठी अर्जुन भास्कर काळे यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केली. आमदार आशुतोष काळे यांनी मावळते सभापती अनुसया होन व उपसभापती अनिल कदम यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. 

कर्जत पुन्हा "राष्ट्रवादी'कडे

कर्जत पंचायत समितीत सत्तांतर झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपच्या ताब्यातून पंचायत समिती हिसकावून घेतली. सभापतिपदी राष्ट्रवादीच्या अश्विनी कानगुडे यांची, तर उपसभापतिपदी हेमंत मोरे यांची बिनविरोध निवड झाली. एकूण आठ सदस्य असलेल्या सभागृहात भाजपच्या विद्यमान सभापती साधना कदम वगळता अन्य सात सदस्य उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात विजय मिळविल्यानंतर या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com