प्लाझ्मा थेरपीसाठी सांगली जिल्ह्यातील 'त्या' तिघाजणांची निवड...

धर्मवीर पाटील
मंगळवार, 30 जून 2020

इस्लामपूर येथे मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात सर्वप्रथम 26 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. या सर्वांनी कोरोनावर मात करून आदर्श निर्माण केला.

इस्लामपूर (सांगली) - कोरोना बाधित रुग्णांना संजीवनी ठरेल अशा प्लाझ्मा थेरपीसाठी सांगली जिल्ह्यातील तिघाजणांची निवड करण्यात आली आहे. एबी पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या या तिघांचे रक्त कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी
वापरण्यात येणार आहे. हे तिघे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि आटपाडी येथील हे कोरोनामुक्त झालेले रुग्ण आहेत.

इस्लामपूर येथे मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात सर्वप्रथम 26 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. या सर्वांनी कोरोनावर मात करून आदर्श निर्माण केला. येथील बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुन्यांची कोल्हापूर येथील आरोग्य यंत्रणेकडून वारंवार तपासणी करण्यात आली असून त्यातील एकाची तसेच आटपाडी तालुक्यातील अन्य दोघांची निवड करण्यात आली आहे. यांच्या रक्तातील घटक वापरून इतर कोरोनाबाधित रुग्णांना जीवनदान देण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. यांच्या रक्तातील पांढऱ्या आणि लाल पेशी, प्लेटलेट्स व प्लाझ्मा यांचे घटकनिहाय पृथक्करण केले जाऊन त्यातील प्लाझ्मा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा घटक कोरोनाबाधित रुग्णांना दिला जाणार आहे.

सध्या ए बी पॉझिटिव्ह या गटातील रक्ताचा तुटवडा असून त्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. कोरोना आजाराचे उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच रक्तगटाच्या बाधित रुग्णास देऊन त्याला कोरोनामुक्त करण्याचे प्रयोग बाह्यदेशात यशस्वी झाले असून आपल्याकडेही हेच प्रयोग सुरू करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection of three people from Sangli district for plasma therapy