ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांचे 28 वर्षे मधुमेह मुक्तीचे प्रयोग 

Senior leader Anna Dange lifestyle tips sangli marathi news
Senior leader Anna Dange lifestyle tips sangli marathi news

सांगली : ज्येष्ठ नेते अण्णा डांगे आता 87 वर्षे वयाच्या टप्प्यावर अखंडपणे कार्यमग्न आहेत. जवळपास 28 वर्षे मधुमेहासह विविध आजारांसोबत त्यांचा लढा सुरु आहेच. मात्र या विकारांना त्यांनी औषधोपचाराबरोबरच आपल्या जीवनशैलीतून नियंत्रणात ठेवले आहे. त्यांच्या आरोग्यविषयक प्रयोगांविषयी ते सांगत आहेत.

1992 ला मला मधुमेह जडल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मी खेड्यातला, रानावनात फिरलेला, शुगर मला होईल हे काही मला मान्यच नव्हते. दवाखान्याबाहेर आलो आणि सारी औषधे फेकून देऊन मी मधुमेहाला विसरून गेलो. त्यानंतर 5 जून 1994 रोजीचा तो साक्षात्कारी दिवस उजाडला. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो. पावसाळी अधिवेशनाआधीच विरोधकांची चहापानाच्या बैठकीत सर्वांसमोर जेवण करता करता मी धाडकन्‌ कोसळलो. सारी यंत्रणा होती म्हणून मी वाचलो. जवळपास तीस दिवस बेशुध्दच होतो. शुध्दीवर आल्यावर डॉक्‍टरांनी मधुमेह आणि रक्तदाबाची औषधे दिली आणि आता चुकवायची नाहीत असा सक्त आदेशच दिला. तेव्हापासून शुगर-बीपी सहकारी झाले. तिथून माझी जणू आजारांची मालिकाच सुरु झाली. तीन वेळा मुतखड्यांची शस्त्रक्रिया, हॉर्निया, प्रोस्टेड ग्रंथी अशा विकारांची एकूण आठ ऑपरेशन्स झाली. 

दोन वर्षापुर्वी सततच्या शुगरने हात आखडला आणि त्यासाठी शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. मात्र आता शस्त्रक्रिया नाही हे मी मनोमन ठरवले. तसा निग्रहच केला. आयुष्यभर मी एका शिस्तीने जगलो आहे. मग आयुर्वेदाचे प्रयोग सुरु झाले. अवघडलेल्या हातावर पुण्याच्या वैद्य खडीवाले यांनी लेप सुचवला. एरंड, धोतरा, निरगुडसर अशा वनस्पतींचा तो लेप सलग पंधरा दिवस लावला आणि त्यातून मोठा दिलासा मिळाला. या काळात मी आहारात बदल केले आणि पुर्ण इन्शुलीनमुक्त झालो. आता मधुमेहाची एक गोळी असते. रक्त पातळ होण्याची गोळी असते मात्र आता गेली दोन वर्षे माझी साखर 97-152 अशी सलगपणे नियंत्रणात आहे. याचे श्रेय माझ्या सर्व डॉक्‍टरांना आणि या प्रयोगांना आहे. 

आहाराच्या पातळीवरही मी अनेक प्रयोग केले आहेत. त्यातला एक प्रयोग म्हणजे 1995 पासून मी ज्वारी,गहू, सातू, सोयाबीन, नाचणी आणि हातसडीचे तांदूळ अशा सहा धान्यांची भाकरीच खातो. कुठेही असलो तरी वर्षातले किमान 360 दिवस हीच भाकरी. हा सल्ला मला मिरजेच्या पटवर्धन डॉक्‍टरांनी दिला. माझे एक स्नेही एल.व्ही.कुलकर्णी यांच्या सौभाग्यवतींनी मला एकदा साखर नियंत्रणासाठी दुध वर्ज्यचा सल्ला दिला. त्यांनीच मला मुग उसळ खायचा सल्ला दिला. मी सलग सहा महिने त्यावरच जगलो. प्रोटीन्सचा साठा असलेले मुग प्रत्येकाने आहारात वाढवलेच पाहिजे. 

माझा दिवस पहाटे साडेतीनला सुरु होतो. त्यानंतर चारला तीन किलोमीटर रोज चालतो. त्यानंतर अर्धा पाऊन तास डायरी किंवा अन्य लेखन. वर्तमानपत्र, देवपुजा करून मी साडेआठला ताटावर बसतो. इस्लामपूरात असेन तेव्हा दिवसभर आष्ट्यात शाळेत असतो. दुपारी अगदीच भूक लागली तर एखादे फळ, चहा भंडग. रात्री साडेसातला जेवण करून टीव्ही मालिका-बातम्या बघून साडेनऊला पाठ टेकलेली असते. एखाद्यावेळी मध्यरात्री लवकर उठून लिहायला बसलो तरच दुपारची तासभराची झोप. पण ती दुर्मिळच. आपल्या शरीराला काय मानवेल यानुसार मी आहार-विहारात बदल केले. सतत कामात राहणे ही तर माझी जगण्याचीच गरजच आहे. आज मी नव्वदीच्या टप्प्यावर पुन्हा सर्व विकारमुक्त व्हायचा माझा संकल्प आहे. 

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com