ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके  यांचे अल्पशा आजाराने निधन 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार व खासदार मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके (वय 79) यांचे आज रात्री दहा वाजता अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उद्या (शनिवारी) दुपारी तीनच्या सुमारास खारेकर्जुने (ता. नगर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

नगर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार व खासदार मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके (वय 79) यांचे आज रात्री दहा वाजता अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उद्या (शनिवारी) दुपारी तीनच्या सुमारास खारेकर्जुने (ता. नगर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक असलेले पुत्र रावसाहेब व तीन मुली, असा परिवार आहे. रक्तातील साखर वाढल्याने शेळके यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस त्यांच्यावर पुण्यातही उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असतानाच आज दुपारी दोनच्या सुमारास शेळके यांची प्राणज्योत मालवली. 

साधी राहणी 
दादा पाटील चार वेळा आमदार व दोनदा खासदार होऊनही त्यांची साधी राहणी जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात कौतुकाचा विषय होता. त्यांच्या वागणुकीत कोणताही डामडौल कधीच नव्हता. वयाच्या 21व्या वर्षीच दादा पाटलांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. ते 1962 पासून 1978 पर्यंत सलग जिल्हा परिषद सदस्य झाले. नगर तालुका पंचायत समितीचे सभापती व उपसभापती ही पदेही त्यांनी भूषविली. सन 1978 पासून 1994 पर्यंत ते विधानसभेवर सलग निवडून गेले. पुढे 1994 व 1996 अशा दोन वेळा ते खासदारही झाले. 

दादा पाटलांनी नगर तालुक्‍यातील वाळकी येथे सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. अवघ्या आठ महिन्यांत कारखाना उभा करून त्यांनी 2001मध्ये पहिला गळीत हंगाम सुरू केला होता. शेती व उसाच्या प्रश्‍नांबाबतचा त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. नगर तालुक्‍यात सुमारे 30 माध्यमिक विद्यालये स्थापन करून स्थानिक संस्थांकडे सुपूर्द केली. हीच विद्यालये स्वतःच्या संस्थेमार्फत सुरू केली असती, तर दादा पाटील तालुक्‍याचे "शिक्षणसम्राट' झाले असते; परंतु त्यांनी शिक्षणाचा "धंदा' केला नाही. 

दादा पाटील शेळके यांचा जीवनपट 
- जन्म ः 2 ऑगस्ट 1941 
- गाव ः खारेकर्जुने (ता. नगर) 
- शिक्षण ः एस.एस.सी. 
- चार वेळा आमदार (1978 ते 94) 
- दोनदा खासदार (1994 व 1996) 

भूषविलेली पदे 
- सदस्य, जिल्हा परिषद (1962-78) 
- उपसभापती, पंचायत समिती, नगर (1962-64) 
- सभापती, पंचायत समिती, नगर (1966-67) 
- अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंक (1991) 
- सदस्य, रोजगार हमी योजना समिती, महाराष्ट्र 
- अध्यक्ष, नगर तालुका देखरेख संघ 
- अध्यक्ष, नगर तालुका सहकारी दूध संघ 
- सदस्य, उत्तर विभागीय सल्लागार समिती, रयत शिक्षण संस्था 
- अध्यक्ष, नगर तालुका सहकारी साखर कारखाना 

स्थापन केलेल्या संस्था 
- खारेकर्जुने विविध सहकारी संस्था 
- लोकहितवादी शिक्षण संस्था 
- नगर तालुका सहकारी साखर कारखाना 
- नगर तालुका सहकारी दूध संघ 
- नगर तालुका सहकारी दूधउत्पादक पतसंस्था 
- सीना वाहतूक सहकारी संस्था 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior leader Dada Patil Shelke is no more