ज्येष्ठ, व्याधीग्रस्तांना केंद्रावर थेट गेल्यासही लस मिळणार :  सांगली जिल्हाधिकारी

Seniors and patients will get vaccinated even if they go directly to the center: Sangli Collector
Seniors and patients will get vaccinated even if they go directly to the center: Sangli Collector

सांगली : ज्येष्ठांना कोविड लसीकरणासाठी आगाऊ नोंदणीची गरज नाही. थेट केंद्रावर ओळखीच्या व वयाच्या पुराव्यांसह गेल्यास मोफत लस दिली जाईल, असे आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कालपासून लसीकरणाच्या दुसरा टप्पा सुरू झाला असून महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात 26 ठिकाणी लसीकरणाची सोय असून काही दिवसातच नोंदणीकृत खासगी हॉस्पिटल्समध्येही अडीचशे रुपयांत लस उपलब्ध असेल असेही त्यांनी सांगितले. 

आज श्री. चौधरी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, डॉ. विवेक पाटील यांच्यासमवेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,""पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग व शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरवात झाली.

आत्तापर्यंत 23 हजार 755 जणांना पहिला डोस, तर 5 हजार 108 जणांना दुसरा डोस दिला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात कालपासून ज्येष्ठ नागरिक तसेच व्याधीग्रस्त अशा 45 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. या टप्प्यात खासगी हॉस्पिटल्समध्येही लस दिली जाईल. दीडशे रुपये लसीचे व जास्तीत जास्त शंभर रुपये लस देण्याचे, असे अडीचशे रुपये लाभार्थीकडून आकारता येईल.

जी हॉस्पिटल्स महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट आहेत, तेथेच खासगीत लस उपलब्ध असेल. त्यासाठी आम्ही त्या हॉस्पिटल्समध्ये लसीकरणासाठी तीन स्वतंत्र खोल्या आणि लस साठवणुकीसाठी शीतपेट्यांची सोय याची माहिती घेत असून, त्यानंतर त्यांना परवानगी दिली जाईल.'' 

ऑनलाईन रजिस्ट्रेशनही 
लसीकरणासाठी ऑनलाईनही नोंदणी करता येईल. त्यासाठी ज्येष्ठांना वयाचा फोटो पुरावा (आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन), व्याधीग्रस्तांना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या नोंदणीकृत डॉक्‍टरांचे पत्र लागेल. शासनाने मधुमेह, रक्तदाब अशा वीस व्याधींची यादी जाहीर केली आहे. अशा 45 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना मोफत लस दिली जाईल. नोंदणीसाठी कोविड पोर्टलवर गेल्यानंतर तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राची यादीही दिसेल. नोंदणीनंतर छापील पोहोच पावती घेऊन निश्‍चित केलेल्या दिवशी व वेळी केंद्रावर जाऊन लस घेता येईल. केंद्रावरही आधी पुराव्यांची खातरजमा होईल. 

लस ऐच्छिक पण ती घ्याच! 
जिल्हा शल्यचिकित्सक साळुंखे म्हणाले,""लस घेतल्यानंतर कोणालाही गंभीर स्वरुपाचा त्रास झालेला नाही. किरकोळ स्वरुपाची ताप-कणकण अशा 71 जणांच्या तक्रारी आल्या आहेत. किरकोळ औषधोपचाराने ते बरे झाले आहेत. ही लस पूर्ण ऐच्छिक आहे. मात्र ज्येष्ठांना कोरोनाची बाधा होण्याची अधिकची शक्‍यता विचारात घेता त्यांनी ती घ्यावीच. जिल्ह्यात 80 हजार 330 लसी दाखल झाल्या असून त्यातील 32 लाख 500 लसीचे डोस देण्यात आले असून आवश्‍यकतेप्रमाणे आणखी लसीची उपलब्धता लवकरच होत आहे.'' 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com