book
book

दुष्कामुळेच संतांच्या जीवनाला कलाटणी...

सोलापूर : दुष्काळाने संतांच्या जीवनाला कलाटणी दिली. त्यामुळे संतांच्या वाड्मयात दुष्काळ, पाणी व्यवस्थापन आणि शेती कशी करावी, याबाबत माहिती आलेली आहे. त्यावर संशोधन करुन त्याचा अन्वयार्थ लावणे आवश्‍यक आहे, असे प्रा. डॉ. वामन एम. जाधव यांनी सांगितले. मोडनिंबच्या एम. एच महाडिक महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. संतपरंपरा आणि कृषी संस्कृती यावर त्यांचा अभ्यासाचा, चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. नुकतेच संतपरंपरा आणि कृषी संस्कृती हे त्यांचे पुस्तक पुण्याच्या हर्नीस प्रकाश संस्थेने प्रकाशित केले आहे. 

संतांच्या मांदियाळीतील प्रमुख संतांच्या चरित्राचा विचार केला तर त्यांनी शेतीविषयक खूप खोलवर विचार करुन मांडणी केल्याचे दिसत असल्याचे सांगून श्री. जाधव म्हणाले, "संत ज्ञानेश्‍वरांनी शेती केली नाही पण त्यांच्या काव्यात शेतीचा संदर्भ ठिकाठिकाणी दिसतो. संत सावता माळी यांनी श्रमात परमेश्‍वर मानला. त्यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यात आहे. दुष्काळामुळे त्यांना स्थलांतर करुन माढा तालुक्‍यातील अरणला यावे लागले. सत नामदेव पंजाबपर्यंत भक्ती संप्रदायाचा प्रसार करीत गेले असे जरी म्हटले जात असले तरी त्यांच्या जाण्यामागे दुष्काळ हे कारण होते. संत तुकारामांना दुष्काळाचे बसलेले चटके त्यांच्या अभंगात पदोपदी दिसतात. त्यामुळे त्यांनी सावकारकीची गहाणखत इंद्रायणीच्या डोहात बुलविली.'' 

विठ्ठल इतर 33 कोटी देवांपेक्षा वेगळा आहे, असे सांगून जाधव म्हणाले, "प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र आहेत. तशी विट्ठलाच्या हातात नाहीत. अनेक देव वाहनांवर बसलेले दिसतात. विठ्ठल विटेवर, मातीवर उभा आहे. इतर देवांच्या मूर्ती भव्य दिव्य आहेत. विठ्ठलाची मूर्ती त्या तुलनेत खुजी आहे. त्यामुळे ती सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना हा देव आपला वाटतो. वारीत लोक एकमेकांना उराअरी भेटतात. कुणी कुणाला निमंत्रण देत नाही. तरीही लाखो लोक एकत्र येतात, हे जगातले एक आश्‍चर्य आहे. वारकरी संप्रदायात देव आणि भक्त यांच्यात जीवाभावाचे नाते आहे. त्यामुळे जनाबाई देवाला शिव्या घालते आणि देव ओव्या म्हणून तिचा स्विकार करतात. वारकऱ्यांना चंद्रभागा ही बहिण, कुंडलिंग बंधू, विठ्ठल सखा वाटतो. अन्य कुठल्या प्रदेशात देवाविषयीची या प्रकारची भावना आढळत नाही.'' 

"संत सावता माळी यांनी शेतविषयक दृष्टीकोन त्यांच्या अभंगांतून दिसतो. त्यांच्या शेतात म्हसोबाचा दगड होता. त्यांनी तो बांधावर आणून टाकला. लोक त्याची यात्रा करायचे. सावता महाराजांनी सांभाळलेले बोकड लोकांनी म्हसोबाला कापण्यासाठी त्यांच्याकडे मागितले. त्यांनी ते दिले नाही, अशी गोष्ट त्यांच्या चरित्रात आहे. यावरुन ते अहिंसावादी होते, असे आपवल्याला दिसते त्यांचे अगदी मोजके अभंग उपलब्ध आहेत. नव्या पिढीने त्यांच्या चरित्रसाधनातून शोधून काही गोष्टी काढाव्यात,'' असे त्यांनी सांगितले. 

माऊली या नावात उर्जा 
संतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या आपल्याकडी कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी विज्ञाननिष्ठा समाजावर बिंबवली नाही. उन्हातान्हाचा, पावसाचा विचार न करता वारकरी पंढरपूरला वारीसाठी येतात. अगदी लहान मुलापासून सत्तर-ऐशी वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळेजण पायी चालत असतात. माऊली या एका शब्दाने सगळे एकमेकांशी जोडले आहेत. त्या एका शब्दात मोठी उर्जा सामावलेली आहे, असे जाधव यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com