सेवा रस्त्याची पुरती वाताहत

विश्रामबाग-कर्मवीर चौकातील स्थिती; परिसरात नेत्यांची घरे, कार्यालये
Service Road Bad in Sangli City
Service Road Bad in Sangli City

सांगली - महापौरांच्या घरापासून हाकेचे अंतर. आमदारांच्या कार्यालयापासून ५० मीटर. काँग्रेस प्रमुख नेत्यांच्या घरापासून ५० मीटर. माजी पालकमंत्र्यांच्या कार्यालयापासून ५० मीटर. विश्रामबाग ते कर्मवीर चौक सेवा रस्ता. हे असे अंतर सांगण्याचे कारण म्हणजे या रस्त्याची अवस्था या मंडळींना रोज दिसते. ही मंडळी बहुधा रोज त्याकडे पाहत जातात, तरीही त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. अत्यंत वाईट स्थितीत असलेला हा रस्ता सांगलीची अब्रू वेशीवर टांगत आहे.

कुणाही सांगलीकराने या रस्त्यावरून एकवेळ प्रवास करावा आणि त्याच्या तोंडून महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘उद्धार’ झाला नाही, तर सांगाल ते, अशी पैज लावण्यासारखी परिस्थिती. खड्डे मोजायला गेलात, तर एकूण रस्त्याच्या अंतरापेक्षा खड्ड्यांचा आकार अधिक होईल. त्यात साचलेले पाणी, त्याची झालेली दलदल, वाहने जाताना पाणी उडल्याने होणारी पंचाईत... इकडे आपण का आलो, असा प्रश्‍न पडतोच पडतो.

जिल्हा बँकेपासून या रस्त्याची कर्मकहाणी सुरू होते, ती थेट हॉटेल पै प्रकाशच्या दारात जाऊन थांबते. या बहुतेक प्रवासात फक्त हॉटेल ग्रेट मराठासमोरचा २०० फुटाचा पट्टा सोडला तर खड्डा नाही, असा भाग दाखवा, असे खुले आव्हान सामान्य नागरिक देऊ शकतो.

सांगली ते मिरज रस्ता चौपदरी झाला आहे. तो सहापदरी करण्याचे स्वप्न पहिले जात आहे. हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ एच होण्याची चिन्हे आहेत. अर्थात, ही दंतकथा वाटण्याआधी तो मंजूर व्हावा, अशी अपेक्षा आता लोक करत आहेत. त्याचाच भाग हा सेवा रस्ता आहे. त्याचे काम का केले जात नाही, याचे उत्तर कुणाकडेच नाही. कदाचित, सहापदरी करताना तो उकरायचाच आहे, तर दोन-चार वर्षे थांबू, असे सरकारी खजिन्याची प्रचंड चिंता करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाटत असावे.

कागदी नाव फिरवा, आनंद घ्या...!

कुणाला जर आपले लहानपणीचे दिवस आठवत असतील तर, ‘वो कागज की कश्‍ती, वो बारीश का पाणी’ आठवत असेल तर चिंता करू नका... तुम्ही निवांत वेळ काढा आणि वसंतदादा मार्केट यार्डच्या समोर तळे साचले आहेच, त्यात कागदी नावा फिरवण्याचा आनंद घ्या. यंदा पाऊस कमी दिसतोय, कृष्णा नदीला पाणी कमी आले तर या डबक्यात कागदी नावांच्या शर्यती घेण्याचा विचार करायलाही हरकत नाही, अशी कुजबुज सध्या सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com