मुंबईत जीव धोक्‍यात घालून  एसटी कर्मचाऱ्यांची सेवा...आतापर्यंत 109 जण बाधित : 56 जणांचा अहवाल प्रलंबित

ST.jpg
ST.jpg

सांगली-  मुंबईत "बेस्ट' च्या मदतीसाठी जाऊन परतलेल्या चारशे एसटी कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 109 जण कोरोना बाधित असल्याचे आढळले आहे. तर अद्याप 56 कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केली नसून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान मुंबईत अतिशय धोकादायक स्थितीत जीव मुठीत घेऊन "ड्युटी' बजवावी लागत असल्याबद्दल कर्मचारी वर्गातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. एसटी कामगार संघटनेने याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

मुंबईत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "लोकल' रेल्वेसेवा बंद असल्यामुळे महापालिकेच्या "बेस्ट' सेवेवर ताण जाणवत आहे. त्यामुळे बेस्टच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून एसटी गाड्यांसह कर्मचारी रवाना झाले आहेत. "बेस्ट' ला गाड्या व कर्मचारी पुरवल्याबद्दल एसटीला प्रति किलोमीटर 75 रूपये प्रमाणे उत्पन्न मिळत आहे. तर कर्मचाऱ्यांची जेवण आणि राहण्याची सोय "बेस्ट' मार्फत करण्यात आली आहे. उत्पन्नाच्या आशेने एसटी महामंडळाने कुमक पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू कर्मचाऱ्यांना पुरेशा सोई-सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याशी पर्यायाने जीवाशी खेळण्याचा प्रकार केला जात आहे. 

मुंबईत गेलेल्या 400 चालक-वाहकांची पहिली बॅच परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत 109 जणांनी कोरोना जिल्ह्यात आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. अद्यापही 56 जणांनी कोरोना चाचणी केली नसून त्यांच्या अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी होत असताना सोमवारी एकाच दिवसात 102 जण वाढले. तसेच आजअखेर 109 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान मुंबईतून परतलेल्या कर्मचाऱ्यांकडून तक्रारीचा पाढा वाचला जात आहे. आगाराप्रमाणे तेथे ठराविक मार्ग ठरवून दिले आहेत. त्यांच्या गाड्या निर्जंतुकीकरण केल्या जात नाहीत. दिवसभरात लांब पल्ल्याच्या दोन ड्युटी कराव्या लागत आहेत. "बेस्ट' चे कर्मचारी मात्र एकच ड्युटी करत आहेत. ड्युटीवरून मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यास दोन ते अडीच तास लागतात. रात्री उशिरा जेवण आणि मुक्काम केल्यानंतर पुन्हा सकाळी लवकर जावे लागते. जेवण, राहणे आणि इतर सुविधा व्यवस्थित नसल्यामुळे जीव धोक्‍यात घालून काम करावे लागत असल्याच्या तक्रारी कर्मचारी करत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com